ठाणे – बोरिवली बोगद्याचा वाद न्यायालयात
मुंबई : ठाणे- बोरिवली या शहरांमधील अंतर कमी करणारा बोगदा आता कायद्याच्या कचाट्यात सापडला आहे. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाखालून जाणाऱ्या ठाणे ते बोरिवलीदरम्यानच्या दुहेरी भुयारी बोगद्यांच्या कामासाठी स्थापन केलेल्या रेडी मिक्स काँक्रिट (आरएमसी) प्रकल्पामुळे ठाणेस्थित हावरे सिटी टाऊनशिप परिसरात वायू प्रदूषणाची समस्या निर्माण झाली असून स्थानिकांचे आरोग्य धोक्यात आल्याच्या दाव्याची उच्च न्यायालयाने गुरुवारी दखल घेतली. तसेच, प्रकल्पस्थळाच्या पाहणीसाठी एक समिती स्थापन करण्याचे स्पष्ट केले.
आरएमसी प्लांट, कास्टिंग यार्ड आणि कर्मचारी निवारागृह सध्याच्या जागेवर राहिल्यास परिसरातील रहिवाशांच्या आरोग्यावर आणखी गंभीर परिणाम होतील. तसेच, राष्ट्रीय उद्यनातील पर्यावरणालाही धोका निर्माण होईल. त्यामुळे, आरएमसी प्रकल्प, कास्टिंग यार्ड आणि कर्मचारी निवारागृहासाठी कंपनीला दिलेली परवानगी रद्द करावी. तसेच, एमपीसीबीला या सुविधांसाठी पुढील संमती देण्यापासून रोखावे, अशी मागणी याचिकाकर्त्यांनी केली आहे. याशिवाय, हावरे सिटी टाउनशिपपासून जवळ असलेल्या या सुविधा पर्यायी ठिकाणी हलवण्याचे आदेश देण्याची मागणीही याचिकाकर्त्यांनी केली आहे.
आरएमसी प्रकल्प, कास्टिंग यार्ड आणि कर्मचारी निवारागृह अन्यत्र स्थलांतरित करण्याच्या मागणीसाठी हावरे सिटी टाऊनशिपमधील रहिवाशांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका केली होती. या तिन्हींमुळे परिसरात मोठ्या प्रमाणात वायू प्रदूषण होत असल्याचा दावा याचिकेत करण्यात आला होता. मुख्य न्यायमूर्तीच्या अध्यक्षतेखालील खंडपीठापुढे ही याचिका गुरुवारी सुनावणीसाठी आली. त्यावेळी, आपण वास्तव्यास असलेल्या टाऊनशिपच्या परिसरातच आरएमसी प्रकल्प, कास्टिंग यार्ड आणि कर्मचारी निवारागृह असल्याचे याचिकाकर्त्यांच्या वतीने वकील रोनिता भट्टाचार्य यांनी न्यायालयाला सांगितले. याशिवाय, हा परिसर संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या परिसरातही मोडतो, असेही त्यांनी न्यायालयायाला सांगितले.