कर्करोग तपासणी व जनजागृती आरोग्य शिबिराला उस्फुर्त प्रतिसाद.

 कर्करोग तपासणी व जनजागृती आरोग्य शिबिराला उस्फुर्त प्रतिसाद.

मुंबई, दि १९

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाचे हजारो स्वच्छता कर्मचारी मुंबई महानगर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी समर्पित भावनेने अविरतपणे कार्यरत असतात. हे कार्य करत असताना त्यांचे आरोग्यदेखील महत्त्वाचे असते. ही बाब लक्षात घेऊन बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ‘एफ दक्षिण’ विभागाच्या पुढाकाराने आणि टाटा स्मारक रुग्णालयाच्या सहकार्याने महानगरपालिका क्षेत्रात विविध ठिकाणी कर्करोग तपासणी आणि जनजागृती करिता विशेष आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात आले.

बृहन्मुंबई महानगरपालिकेचे विविध कर्मचारी आणि कामगार हे मुंबई महानगरात दररोज सार्वजनिक ठिकाणी निर्माण होणाऱ्या कचऱ्याचे संकलन करणे, रस्त्यांची स्वच्छता करणे, नाले तसेच सार्वजनिक शौचालयांची स्वच्छता करणे आदी कामे करीत असतात. ही कामे करताना दुर्गंधी, धूळ, आणि आरोग्यास हानिकारक अशा घटकांशी कर्मचाऱ्यांचा संपर्क येतो. काही कर्मचारी, कामगार हे व्यसनाधीन होतात. या कारणांनी त्यांना कर्करोगांसारख्या विविध आजारांना सामोरे जावे लागते. यामुळे कर्मचाऱ्याच्या शारीरिक, मानसिक आणि कौटुंबिक जीवनावर विपरीत परिणाम होतो.

या सर्व बाबींपासून त्यांना परावृत्त करणे आणि त्यांचे आरोग्य सुदृढ रहावे, यासाठी उप आयुक्त (परिमंडळ- २) श्री. प्रशांत सपकाळे, एफ दक्षिण विभागाच्या सहायक आयुक्त श्रीमती वृषाली इंगळे यांच्या पुढाकाराने टाटा स्मारक रुग्णालयाच्या सहकार्याने विशेष कर्करोग तपासणी व जनजागृती आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात आले.

या शिबिरामध्ये टाटा स्मारक रुग्णालयाच्या कर्करोग प्रतिबंध विभागाचे तज्ज्ञ वैद्यकीय मंडळी आणि त्यांच्या पथकांकडून कर्मचाऱ्यांची प्रामुख्याने कर्करोग तपासणी करण्यात आली. तसेच, महिला कामगार यांना स्तनांच्या कर्करोगाची पूर्व अवस्था वेळीच ओळखण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. गर्भाशय मुखाच्या कर्करोगाच्या निदानासाठी आधुनिक ‘एचपीव्ही सेल्फ सॅम्पलिंग’ तंत्रज्ञानाचा वापर करून कर्करोग तपासणी आणि निदान करण्यात आले. त्यासोबतच तंबाखू, मद्यपान आदी व्यसनांचे दुष्परिणाम समजावून देत, व्यसनापासून दूर राहण्यासाठी तज्ज्ञांकडून समुपदेशन करण्यात आले. तसेच, पुढील तपासणीसाठी टाटा स्मारक रुग्णालयाच्या कर्करोग प्रतिबंध विभागात पाठविण्यात आले.KK/ML/MS

Milind

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *