महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
नवी दिल्ली दि. १८– जगप्रसिद्ध शिल्पकार महाराष्ट्रभूषण राम सुतार यांच्या पार्थिवावर आज नोएडा येथील वैकुंठ स्मशानभूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. महाराष्ट्र शासनाच्या वतीने राजशिष्टाचार व पणन मंत्री जयकुमार रावल यांनी पुष्पचक्र अर्पण करून आदरांजली वाहिली. तसेच केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनीही आदरांजली वाहिली.
जगातील सर्वात उंच पुतळा असलेल्या ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी‘चे शिल्पकार राम वंजी सुतार यांचे वृद्धापकाळाने नोएडा येथील निवासस्थानी वयाच्या 101 व्या वर्षी निधन झाले होते. आज दुपारी नोएडा येथील वैकुंठ भूमीत संपूर्ण शासकीय इतमामात स्व. सुतार यांच्या पार्थिवावर अंतिम संस्कार करण्यात आले. महाराष्ट्र शासनाच्या वतीने यावेळी मंत्री जयकुमार रावल यांनी आदरांजली वाहिली.
गेल्याच महिन्यात श्री. सुतार यांना ‘महाराष्ट्र भूषण 2024′ पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. हा पुरस्कार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार आणि सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी नोएडा येथे जाऊन त्यांच्या निवासस्थानी प्रदान केला.
मुख्यमंत्री फडणवीस यांची भावपूर्ण श्रद्धांजली
मुख्यमंत्री फडणवीस यांनी सुतार यांच्या पुत्र अनिल सुतार यांना दूरध्वनी करून शोकसंवेदना व्यक्त केल्या. ते म्हणाले, काहीच दिवसांपूर्वी ‘महाराष्ट्र भूषण‘ पुरस्कार प्रदान करण्यासाठी आम्ही त्यांच्या घरी गेलो होतो. पुरस्कार स्वीकारताना त्यांनी ‘महाराष्ट्र माझा‘ गीताच्या ओळी उच्चारल्या होत्या, तेव्हा आम्ही भारावून गेलो होतो. वयाच्या 100 व्या वर्षीही ते इंदू मिल येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या कामात गुंतले होते. त्यांची शिल्पे शतकानुशतके जिवंत राहतील आणि प्रत्येक शिल्प पाहताना त्यांचेच स्मरण होईल. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भावपूर्ण श्रद्धांजली
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे की, राम सुतार यांच्या निधनाने शिल्पकलेचा ‘कोहिनूर‘ काळाच्या पडद्याआड गेला आहे. त्यांनी भारतीय संस्कृती आणि महापुरुषांचे विचार जगभर पोहोचवले. ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी‘, संसदेतील महात्मा गांधींचा पुतळा अशा अजरामर कलाकृतींमुळे ते सदैव जिवंत राहतील. वयाच्या 100 व्या वर्षापर्यंत कलेची साधना करणाऱ्या सुतार यांनी हजारो कलाकारांना मार्गदर्शन केले. त्यांच्या जाण्याने शिल्पकलेचे विद्यापीठच हरपल्याची भावना आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भावपूर्ण श्रद्धांजली
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शोक व्यक्त करत म्हटले आहे की, राम सुतार यांच्या निधनामुळे शिल्पकलेच्या क्षेत्रातील भीष्माचार्य काळाच्या पडद्याआड गेले आहेत. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सरदार पटेल यांसारख्या महापुरुषांच्या शिल्पांद्वारे देशाचा इतिहास जिवंत केला आणि भारतीय स्मारक शिल्पांना जागतिक ओळख मिळवून दिली. ग्रामीण भागातून उदयास आलेल्या या साध्या-नम्र शिल्पकाराने आयुष्याच्या शेवटपर्यंत कलेची साधना केली आणि अनेक कलाकारांना घडवले. त्यांची शिल्पे युगानुयुगे आठवण करून देत राहतील. त्यांच्या कुटुंबीयांना दुःख सहन करण्याची शक्ती मिळो, अशी प्रार्थना करत अजित पवार यांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.