विघवलीत सापळे कुटुंबीयांचा भावनिक गुणवंत सत्कार सोहळा; संघर्ष, कर्तृत्व आणि कृतज्ञतेचा हृदयस्पर्शी संगम
माणगाव, दि ४
तालुक्यातील विघवली गावातील सापळे कुटुंबीयांच्या पूर्वजांच्या निवासस्थानी आयोजित गुणवंत सत्कार सोहळा अत्यंत भावनिक आणि प्रेरणादायी वातावरणात नुकताच संपन्न झाला. कुटुंबातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या सदस्यांचा शाल, श्रीफळ व गुलाबपुष्प देऊन सन्मान करण्यात आला.
यंदाच्या सोहळ्याचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे, स्वतःचा व्यवसाय उभारून यशस्वीपणे वाटचाल करणाऱ्या सापळे कुटुंबीयांचाही विशेष गौरव करण्यात आला. नोकरीच्या सुरक्षित चौकटीबाहेर पडून उद्योजकतेचा मार्ग स्वीकारत कुटुंबाचे नाव उंचावणाऱ्या या सदस्यांचे उपस्थितांनी उभे राहून कौतुक केले. त्याचबरोबर शासकीय, निमशासकीय व खासगी क्षेत्रातून सेवानिवृत्त झालेल्या तसेच स्वेच्छानिवृत्ती स्वीकारलेल्या सदस्यांचाही कृतज्ञतापूर्वक सत्कार करण्यात आला. त्यांच्या दीर्घ सेवाकार्यातील योगदानाची दखल घेत त्यांना सन्मानचिन्ह देण्यात आले.
सापळे कुटुंबीयांची उपस्थिती इतकी मोठ्या संख्येने होती की, कार्यक्रमासाठी उभारलेली जागाही अपुरी पडू लागली. अनेकांनी सभोवतालच्या मोकळ्या जागेत, काहींनी जिन्यावर, तर काहींनी घराच्या ओसरी व गॅलरीत आपली जागा घेतली. अंगण अक्षरशः कुटुंबिय सदस्यांनी फुलून गेले होते. जिकडे नजर जाईल तिकडे सापले कुटुंबीयांची उपस्थिती दिसत होती आणि सर्वजण उत्सुकतेने कार्यक्रमाचे क्षण टिपत होते. मुख्य व्यासपीठावरून सत्कार समारंभ पार पडत होता आणि उपस्थित मंडळी आपापल्या जागेवरून तो सोहळा अनुभवत होती.
संपूर्ण परिसर आकर्षक सजावट, लुकलुकणाऱ्या रोषणाई, झगमगत्या फ्लडलाईट्स आणि देखण्या पेंडालमुळे सणासुदीच्या वातावरणाने नटला होता. उत्कृष्ट ध्वनीप्रणालीमुळे प्रत्येक मनोगत स्पष्टपणे सर्वांपर्यंत पोहोचत होते. या सर्व व्यवस्थेमुळे कार्यक्रमाला भव्य आणि दिमाखदार स्नेहमेळाव्याचे स्वरूप प्राप्त झाले.
सत्कारावेळी अनेक गुणवंतांनी आपल्या जीवनप्रवासातील संघर्ष, अडचणी आणि यशोगाथा मनोगताद्वारे व्यक्त केल्या. विशेष म्हणजे, जवळजवळ सर्वांनी आपल्या यशाचे संपूर्ण श्रेय आई-वडिलांना दिले. काही ज्येष्ठांनी आपल्या मोठ्या भाऊ-बहिणींचे मार्गदर्शन आठवले, तर काहींनी काका-काकू, मामा-मामी तसेच इतर नातेवाईकांचे योगदान कृतज्ञतेने स्मरले. कुटुंबाच्या एकोप्यामुळेच हे यश शक्य झाले, अशी भावना प्रत्येकाच्या शब्दांतून व्यक्त होत होती.
कार्यक्रमादरम्यान आनंदासोबतच भावना दाटून आल्याचे चित्रही वारंवार दिसून आले. अनेकांच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळले. काही जण आपल्या संघर्षमय प्रवासाची कहाणी सांगताना अक्षरशः रडू लागले; परंतु ते दुःखाचे नव्हे, तर परिश्रमाचे चीज झाल्याचा समाधानाचा आणि कृतज्ञतेचा भाव होता. विशेषतः युवतींनी आपल्या उच्च शिक्षणासाठी आई-वडिलांनी कोणतीही तडजोड न करता सर्वतोपरी पाठबळ दिल्याची हृदयस्पर्शी उदाहरणे मांडली. “आमच्या शिक्षणासाठी त्यांनी कधीच अडथळा येऊ दिला नाही,” असे सांगताना त्यांच्या डोळ्यांत अभिमान आणि प्रेम दोन्ही दाटून आले होते.
दरम्यान, संपूर्ण कार्यक्रमाचे वातावरण एका क्षणी भारावून गेले, जेव्हा कुटुंबातील विशेष गुणवंत व दिव्यांग सदस्य सिद्धी संगीता अशोक ताम्हणकर यांना व्हीलचेअरवरून विशेष आणि अनपेक्षित असा सन्मान देण्यात आला. सिद्धी या वामन सापळे यांची नात असून त्यांची आई संगीता या वामन सापळे यांच्या कन्या आहेत. त्यांना सन्मानित करताच त्या भावुक झाल्या. “माझ्यासाठी कशाचा सत्कार? मी काही विशेष केलेले नाही,” असे त्या नम्रपणे म्हणाल्या. मात्र, उपस्थितांनी त्यांचे लक्ष वेधले की त्यांनी आपल्या आरोग्याच्या अडचणींवर मात करत उच्च शिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण केले आहे आणि तेच त्यांच्या कर्तृत्वाचे मोठेपण आहे. हे ऐकताच त्या क्षणभर थबकल्या आणि हलक्या आवाजात म्हणाल्या, “अरे, तेच का? त्यात काय एवढं मोठं…” त्यांच्या या साध्या शब्दांनंतर संपूर्ण परिसर टाळ्यांच्या कडकडाटाने, अभिनंदनाच्या घोषणांनी आणि शुभेच्छांनी दुमदुमून गेला.
हा प्रसंग केवळ एका व्यक्तीच्या सन्मानाचा नव्हता, तर जिद्द, आत्मविश्वास आणि कुटुंबाच्या पाठबळाचे प्रतीक ठरला.
एकूणच, विघवली गावातील सापळे कुटुंबीयांचा हा सत्कार सोहळा आनंद, कृतज्ञता, संघर्ष आणि यश यांचा भावनिक संगम ठरला. कुटुंबाच्या पूर्वजांच्या घरात पार पडलेला हा कार्यक्रम केवळ औपचारिक सन्मान नव्हता, तर पिढ्यान् पिढ्यांच्या संस्कारांचा, परिश्रमाचा आणि एकोप्याचा जिवंत साक्षीदार ठरला.KK/ML/MS