मराठा व समकालीन शस्त्रांचे फिरते संग्रहालय जनतेसाठी खुले
मुंबई, दि. १९ : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत पुरातत्त्व व वस्तुसंग्रहालय संचालनालयाच्या वतीने “मराठा व समकालीन शस्त्रांचे फिरते संग्रहालय” या उपक्रमाचे उद्घाटन आज सांस्कृतिक कार्य मंत्री अँड आशिष शेलार यांच्या हस्ते करण्यात आले. हा उद्घाटन सोहळा पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, प्रभादेवी, मुंबई येथे आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाला विविध मान्यवर, इतिहासप्रेमी, अभ्यासक तसेच नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली.
या उपक्रमाचा उद्देश मराठा इतिहासातील शौर्यपरंपरा, युद्धकला आणि पारंपरिक शस्त्रसंपदा नव्या पिढीपर्यंत पोहोचवणे हा असून फिरत्या संग्रहालयाच्या माध्यमातून राज्यातील विविध भागांत हा ऐतिहासिक ठेवा प्रदर्शित केला जाणार आहे.
कार्यक्रमाचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते करण्यात आले. आपल्या मनोगतात त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमातून प्रेरणा घेऊन इतिहास संवर्धनासाठी शासन कटिबद्ध असल्याचे सांगितले.
या प्रसंगी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार यांचे प्रेरणादायी नेतृत्व आणि मार्गदर्शनाचा उल्लेख करण्यात आला.
या संग्रहालयात मराठा व समकालीन शस्त्रांचे आकर्षक प्रदर्शन मांडण्यात आले आहे. तलवार, भाले, धनुष्यबाण, दांडपट्टा यासह विविध शस्त्रे व त्यांची माहिती यामध्ये देण्यात आली आहे. या संग्रहालयांमुळे तरुण पिढीत इतिहासाविषयी अभिमान आणि जागर निर्माण होईल, असा विश्वास व्यक्त मंत्री शेलार यांनी व्यक्त केला.
या कार्यक्रमाला सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव किरण कुलकर्णी, पुरातत्व विभागाचे संचालक तेजस गर्गे, पु. ल. देशपांडे कला अकादमीच्या संचालिका मीनल जोगळेकर यांच्यासह विविध मान्यवर उपस्थितीत होते.ML/ML/MS