NCERT ने वगळला मराठा साम्राज्याच्या अटक ते कटक विस्ताराचा नकाशा
नवी दिल्ली, दि. २५ : NCERT ने इयत्ता आठवीच्या सामाजिक शास्त्राच्या पाठ्यपुस्तकातून १७५९ सालचा मराठा साम्राज्याचा ‘कटक ते अटक’ विस्तार दर्शवणारा नकाशा वगळला आहे. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी तीव्र आक्षेप नोंदवला असून, हा ऐतिहासिक नकाशा तातडीने पुन्हा समाविष्ट करण्याची मागणी केली आहे. ही मागणी करताना अमोल कोल्हे यांनी ‘अहमदिया करार’ आणि ‘चौथ’ वसूल याचाही दाखला दिला. शैक्षणिक अभ्यासक्रमात बदल करताना कोणत्याही राजकीय दबावापेक्षा ऐतिहासिक सत्याला आणि पुराव्यांना प्राधान्य मिळणे अपेक्षित आहे, असे मत अमोल कोल्हे यांनी व्यक्त केले. “अटक ते कटक असा विस्तार असलेल्या मराठा कालखंडाचा नकाशा योग्य पुराव्यांच्या आधारावर पुन्हा समाविष्ट करून भावी पिढीला भारताच्या गौरवशाली इतिहासाची अचूक माहिती द्यावी, हीच आग्रही विनंती आहे.,” असेही त्यांनी म्हटले.
NCERT च्या इयत्ता आठवीच्या इतिहासाच्या पुस्तकात (२०२५-२६ शैक्षणिक वर्ष) १७५९ मधील मराठा साम्राज्याचा नकाशा वगळण्यात आल्याने वाद निर्माण झाला आहे. या नकाशात जैसलमेर, मेवाड व बुंदी या राजपूताना भागांना मराठा साम्राज्याचा भाग दाखवल्यामुळे जैसलमेरच्या राजघराण्याने आक्षेप घेतला होता. त्यानंतर एनसीईआरटीकडून हा नकाशा हटवण्यात आला. मात्र, हा नकाशा पुस्तकातून काढून टाकल्यामुळे महाराष्ट्रातून नाराजी व्यक्त होत आहे.
खासदार अमोल कोल्हे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून NCERT च्या या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. ते म्हणाले की, “अभ्यासक्रमातून मराठा साम्राज्याचा नकाशा वगळण्याचा निर्णय वस्तुनिष्ठ पुराव्यांच्या निकषावर तपासणे आवश्यक आहे. १७५२ चा ‘अहमदिया करार’, ब्रिटीश गॅझेटिअर आणि राजपुताना गॅझेटिअरमधील नोंदी स्पष्टपणे सांगतात की, तत्कालीन राजस्थानमधील जयपूर आणि जोधपूर सारख्या प्रमुख संस्थानांवर मराठ्यांचा मोठा प्रभाव होता आणि तेथून रीतसर ‘चौथ’ वसूल केली जात असे.”
SL/ML/SL