माझी वसुंधरा अभियानांतर्गत मिरा भाईंदर महानगरपालिका सन्मानित
माझी वसुंधरा अभियानांतर्गत मिरा भाईंदर महानगरपालिका सन्मानित
मुंबई, दि. ५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : माझी वसुंधरा अभियान 3.0 अंतर्गत भूमी, जल, वायू, अग्नी व आकाश या निसर्गाशी संबंधित पंचतत्वांवर आधारित स्थानिक स्वराज्य संस्थांची स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेअंतर्गत अमृत गटामध्ये सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या अमृत शहरांमध्ये 3 ते 10 लाख लोकसंख्या गटात मिरा भाईंदर महानगरपालिकेचा समावेश करण्यात आला आहे.
माझी वसुंधरा अभियानांतर्गत पर्यावरणाचे संवर्धन, संरक्षण व जतन करण्यासाठी राज्यस्तरावर 3 ते 10 लाख लोकसंख्या गटात प्रथम क्रमांक व भूमी या थीमॅटीक भागात अत्युकृष्ठ कामगिरी केल्याबद्दल आज “जागतिक पर्यावरण दिनानिमित्त” मिरा भाईंदर महानगरपालिकेस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते प्रथम क्रमांकाचे प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. सदर सन्मान स्विकारण्यास आयुक्त तथा प्रशासक दिलीप ढोले यांच्यासह वरिष्ठ पालिका अधिकारी उपस्थित होते .
3 ते 10 लाख लोकसंख्या गटात प्रथम क्रमांक प्राप्त केल्याने 7 कोटी ची रक्कम, प्रमाणपत्र तसेच भूमी या थीमॅटीक भागात अत्युकृष्ठ कामगिरी केल्याने 2 कोटी आणि प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. अश्याप्रकारे एकूण 9 कोटींचे पारितोषिक माझी वसुंधरा अभियान 3.0 मध्ये मिरा भाईंदर महानगरपालिकेस प्राप्त झाले.
सायक्लोथॉन 2023, इंटनर्स द्वारे पथनाट्यद्वारे करण्यात आलेले जनजागृती कार्यक्रम, माझी वसुंधरा हरित शपथ कार्यक्रम, वनमहोत्सव 2023, वृक्षलागवडीचे कार्यक्रम, मियावाकी संकल्पनेतून साकारलेल्या शहरी जंगलाचे लोकार्पण हे पंचतत्वावर आधारित असलेले कार्यक्रम मिरा भाईंदर महानगरपालिका उद्यान विभागामार्फत घेण्यात आले होते. सदर उपक्रमांची दखल घेत मिरा भाईंदर महानगरपालिकेला माझी वसुंधरा 3.0 अभियान पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.
ML/KA/SL
5 June 2023