LPG च्या अखंडीत पुरवठ्याची केंद्र सरकारकडून हमी

 LPG च्या अखंडीत पुरवठ्याची केंद्र सरकारकडून हमी

नवी दिल्ली, १३ मार्च : घरगुती LPG (स्वयंपाकाचा गॅस) चा अखंडित पुरवठा करण्यात येईल अशी हमी देत नागरिकांनी सिलिंडर्ससाठी घाबरून जाऊन बुकिंग करण्याची कोणतीही आवश्यकता नाही. असे आज केंद्र सरकारकडून स्पष्ट करण्यात आले. माध्यमांना माहिती देताना, पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या सहसचिव सुजाता शर्मा यांनी सांगितले की, ५ मार्चपासूनच LPG चे देशांतर्गत उत्पादन ३० टक्क्यांनी वाढले आहे.

“घाबरून बुकिंग करण्याची काहीही गरज नाही आणि कोणत्याही LPG वितरकाकडे (dealer) गॅसचा साठा पूर्णपणे संपलेला नाही,” असेही शर्मा यांनी पुढे नमूद केले. युद्धपूर्व काळातील सरासरी ५५.७ लाख बुकिंगच्या तुलनेत, सध्या LPG बुकिंगची संख्या ७५.७ लाखांपर्यंत पोहोचली आहे; “यावरून लोक घाबरून बुकिंग करत असल्याचे दिसून येते,” असे त्या म्हणाल्या.

सुजाता शर्मा म्हणाल्या, “कच्च्या तेलाच्या बाबतीत आपल्‌याकडे २५८ मेट्रिक टन शुद्धकरण क्षमता आहे. पेट्रोल आणि डिझेल उत्पादनात आपण स्वंयपूर्ण आहोत. परिणामी भारतात हे इंधन आयात करण्याची आवश्यकता नाही. आमचे सर्व शुद्धीकरण कारखाने सध्या १०० टक्के किंवा त्याहून अधिक क्षमतेने कार्यरत आहेत. शुद्धीकरण कारखाने कच्च्या तेलाचा पुरेसा साठा ठेवतात आणि शिवाय पुरवठा सातत्याने राखला जात आहे. घरगुती ग्राहकांना पीएनजी आणि सीएनजीचा पुरवठा कोणत्याही व्यत्ययाशिवाय किंवा कपातीशिवाय सुनिश्चित केला जात आहे.

एलपीजी हा आमच्यासाठी चिंतेचा विषय आहे. आमची बहुतेक आयात होर्मुझच्या सामुद्रधुनीतून होते. सामुद्रधुनी बंद होणे ही चिंतेची बाब आहे. परंतु, २५ हजार वितरकांपैकी कोणत्याही वितरकाने ड्रायआऊट झाल्याची नोंद केलेली नाही. त्यामुळे अफवांवर विश्वास ठेवू नका. घावरून जाऊ नका, असं आवाहनही पेट्रोलिअम मंत्रालयाने केले आहे.

पश्चिम आशियातील संघर्षामुळे कच्च्या तेलाच्या आणि पेट्रोलियम उत्पादनांच्या पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. याचे मुख्य कारण म्हणजे ‘स्ट्रेट ऑफ होर्मुझ’ (Strait of Hormuz) या जलमार्गाची झालेली कोंडी किंवा बंद अवस्था. इराण आणि ओमान यांच्या दरम्यान असलेला हा अरुंद जलमार्ग जगातील सर्वात महत्त्वाच्या ऊर्जा वाहतूक मार्गांपैकी एक मानला जातो.

आखाती प्रदेशाला अरबी समुद्राशी जोडणाऱ्या, ५० मैल लांबीच्या या अरुंद जलमार्गातून जगातील एकूण तेल आणि द्रवरूप नैसर्गिक वायूचा (LNG) सुमारे पाचवा हिस्सा वाहून नेला जातो. भारत आपल्या गरजेपैकी सुमारे ८८ टक्के कच्चे तेल, ५० टक्के LNG आणि ६० टक्के LPG आयात करतो; आणि यापैकी बहुतांश इंधन याच जलमार्गातून भारतात येते.

पश्चिम आशियातील हा वाढता संघर्ष २८ फेब्रुवारी रोजी सुरू झाला. त्यावेळी अमेरिका आणि इस्रायलने इराणवर हवाई हल्ले केले होते आणि त्यानंतर तेहरानकडूनही (इराणकडूनही) प्रत्युत्तरादाखल हल्ले करण्यात आले. या संघर्षामुळेच सदर जलमार्गातून होणारा ऊर्जेचा (इंधनाचा) प्रवाह खंडित झाला आहे.

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *