पावसाचे पाणी साचणारी ठिकाणे नजरेसमोर ठेवून गाळ काढण्यावर प्राधान्याने लक्ष केंद्रीत करा

 पावसाचे पाणी साचणारी ठिकाणे नजरेसमोर ठेवून गाळ काढण्यावर प्राधान्याने लक्ष केंद्रीत करा

मुंबई, दि ८
मिठी नदीच्या संपूर्ण पाणलोट क्षेत्रात (Catchment Area) तसेच मुंबईतील लहान, मोठे नाल्यांमध्ये ज्या ठिकाणी पावसाळ्यात पाणी साचते, अशा ठिकाणांना नजरेसमोर ठेवून त्या परिसरातील कचरा आणि नाल्यांमधील गाळ प्राधान्याने काढावा. या कामासाठी कालबद्ध नियोजन करून दिनांक ३१ मे २०२६ पर्यंत कोणत्याही परिस्थितीत मुंबईतील नालेस्वच्छता १०० टक्के पूर्ण केली जाईल, याची दक्षता घ्यावी. यासोबतच मोठ्या पर्जन्य जलवाहिन्यांवरील मनुष्य प्रवेशिका (Manhole) किंवा ढाप्यांचीही तपासणी करा, असे निर्देश बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त श्रीमती अश्विनी भिडे यांनी दिले.

पावसाळा सुरू होण्यापूर्वी मुंबईतील नाले आणि नद्या यातून गाळ उपसा करून स्वच्छ करण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. मुंबईतील नाला स्वच्छतेबरोबरच मिठी नदीवर सुरू असलेल्या तीन पॅकेज अंतर्गत सहा ठिकाणी कामांची सुरुवात झाली आहे.

या पार्श्वभूमीवर महानगरपालिका आयुक्त श्रीमती अश्विनी भिडे, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) श्री. अभिजीत बांगर यांनी वांद्रे-कुर्ला संकुलातील एमएमआरडीए कार्यालयाजवळील जेतवन उद्यान येथे मिठी नदी, वरळीतील (जी दक्षिण) नेहरू विज्ञान केंद्र नाला, दादर धारावी नाला (जी उत्तर) येथे सुरू असलेल्या स्वच्छता कामांची आज (दिनांक ८ एप्रिल २०२६) प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली.

वरळीतील (जी दक्षिण विभाग) नेहरू विज्ञान केंद्र नाल्यातून गाळ काढण्याचे काम कधी सुरू झाले आणि कधीपर्यंत पूर्ण होणार आहे, याची माहिती आयुक्तांनी घेतली. त्याचबरोबर नाल्याच्या संपूर्ण पाणलोट क्षेत्रात (Catchment Area) ज्या ठिकाणी पावसाळ्यात पाणी साचते, अशा ठिकाणांना नजरेसमोर ठेवून त्याच्या आजूबाजूचा परिसरातील कचरा तसेच किंवा नाल्यामधील गाळ प्राधान्याने काढला जाईल, याची दक्षता घ्यावी, अशा सूचना श्रीमती भिडे यांनी केल्या. दिनांक ३१ मे २०२६ पर्यंत कोणत्याही परिस्थितीत नालेसफाई १०० टक्के पूर्ण केली जाईल, याची दक्षता घेण्याच्या सूचना महानगरपालिका अधिकाऱ्यांना दिल्या.

तसेच, संपूर्ण शहर विभागातील मोठ्या पर्जन्य जलवाहिन्यांवरील मनुष्य प्रवेशिका (Manhole) किंवा ढापे यांची सद्यस्थिती गांभीर्याने तपासून पहावी. ज्या ठिकाणी जाळ्या बसविण्यात आल्या आहेत, त्या जाळ्या सुस्थितीत आहेत, याची खबरदारी घ्यावी, असे निर्देश श्रीमती भिडे यांनी दिले.

वरळी नाका तसेच संत गाडगे महाराज चौक (सातरस्ता) परिसरामध्ये पाणी साचण्याची सखल ठिकाणे आहेत. अशा ठिकाणी पावसाच्या पाण्याचा निचरा व्हावा, यासाठी मेट्रो तसेच रस्ते विभाग यांच्या समन्वयाने पावसाळी जलवाहिनीला संलग्न असणाऱ्या जोडण्या (Lateral) सुस्थितीत राहतील, याची दक्षता घेण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या.

दादर धारावी नाला येथे महानगरपालिका आयुक्त श्रीमती भिडे यांनी भेट दिली. यावेळी माहिती देताना संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितले की, दादर धारावी नाल्यात नागरिकांकडून फेकला जाणारा तरंगता कचरा ही मोठी समस्या आहे. अशा ठिकाणी एकापेक्षा अधिक वेळा नालेस्वच्छता करणे अपेक्षित आहे. या नाल्याच्या वरिल भागात (Upstream) काही ठिकाणी भिंत खचली आहे. त्यामुळे आजूबाजूच्या नागरिकांना धोका निर्माण होवू शकतो. तरी संबंधित प्रभाग अधिकारी तसेच पर्जन्य जलवाहिन्या विभागाने समन्वयाने भिंतीच्या दुरुस्तीचे काम विनाविलंब करावे. शहरामध्ये ज्या ठिकाणी नाल्यांमध्ये नागरिकांकडून कचरा फेकला जाण्याची समस्या आहे, अशा नाल्यांना जाळ्या बसविण्याचा उपक्रम हाती घ्यावा, जेणेकरून नाल्यांमध्ये कचरा फेकले जाण्यापासून प्रतिबंध होवू शकेल, असे निर्देश श्रीमती भिडे यांनी दिले.

मिठी नदीचा गाळ काढण्याच्या गुणवत्तेबाबत अधिकाऱ्यांनी आग्रही रहावे
मिठी नदीच्या तीनही पॅकेजमध्ये नालेस्वच्छतेची सहा ठिकाणी कामे सुरू करण्यात आली आहेत. या कामांची पॅकेजनिहाय माहिती महानगरपालिका आयुक्त श्रीमती अश्विनी भिडे यांनी घेतली. पॅकेजनिहाय उर्वरित कालावधीचे नियोजन, किती वाहने तसेच यंत्रसामुग्री (Machinery) उपलब्ध करून दिली आहे, अपेक्षित गतीने काम करण्यासाठी त्यामध्ये किती वाढ होणे अपेक्षित आहे, याचा आढावा घेवून कामाची गती वाढविण्यासाठी आवश्यक त्या बाबी कराव्यात, अशा सूचना श्रीमती भिडे यांनी दिल्या. मिठी नदीतील गाळ काढण्याबाबत विशेषत्त्वाने गुणवत्तेबाबत अधिकाऱ्यांनी प्रचंड आग्रही असणे आवश्यक आहे, असे महानगरपालिका आयुक्तांनी नमूद केले. संपूर्ण प्रक्रियेत पारदर्शकता राहावी, यासाठी कृत्रिम बुद्धिमता (Artificial Intelligence) आधारित संगणकीय प्रणाली (Software System) निर्माण करण्यात आली आहे. तिचा योग्य वापर करावा, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.

यावेळी उप आयुक्त (पायाभूत सुविधा) श्री. गिरीश निकम, प्रमुख अभियंता (पर्जन्य जलवाहिन्या) श्रीमती कल्पना राऊळ, उप प्रमुख अभियंता श्री. संजय इंगळे यांच्यासह संबंधित अधिकारी, अभियंते उपस्थित होते.JS/ML/MS

Milind

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *