बेकायदेशीर रसायनांचा वापर केल्यामुळे महाराष्ट्र सरकारकडून ‘कॉम्फर्ट’ अगरबत्तीवर बंदी

 बेकायदेशीर रसायनांचा वापर केल्यामुळे महाराष्ट्र सरकारकडून ‘कॉम्फर्ट’ अगरबत्तीवर बंदी

मुंबई, 27 : भारतामध्ये घरगुती कीटकनाशकांच्या सुरक्षित वापरास प्रोत्साहन देणाऱ्या ना-नफा तत्वावरील उद्योग मंडळ होम इन्सेक्ट कंट्रोल असोसिएशन (HICA) तर्फे बेकायदेशीर डास प्रतिबंधक अगरबत्ती ‘कॉम्फर्ट’ विरोधात महाराष्ट्र सरकारने केलेल्या कारवाईचे स्वागत करण्यात आले आहे. ‘कॉम्फर्ट’ ही डास प्रतिबंधक अगरबत्ती महाराष्ट्र, तमिळनाडू, उत्तर प्रदेश आणि दिल्ली येथे विक्रीस उपलब्ध असून ती मेसर्स धूप छांव कंपनी यांचे उत्पादन आहे. खुल्या बाजारातून गोळा करण्यात आलेल्या नमुन्यांवरून हे उत्पादन अनभिज्ञ ग्राहकांकडून खरेदी केले जात असल्याचे स्पष्ट झाले असून, महाराष्ट्र कृषी विभागाने केलेल्या प्रयोगशाळा चाचण्यांमध्ये ‘कॉम्फर्ट’ मध्ये बेकायदेशीर आणि मान्यता नसलेले रसायन डाइमफ्लुथ्रिन आढळून आले आहे. ‘कॉम्फर्ट’ अगरबत्त्या मुंबई, पुणे, औरंगाबाद, नाशिक तसेच उर्वरित संपूर्ण महाराष्ट्रात विक्रीस असल्याचे सांगितले जाते.

मुंबईमध्ये टाकण्यात आलेल्या छाप्यादरम्यान अधिकाऱ्यांना डाइमफ्लुथ्रिन असलेल्या ‘कॉम्फर्ट’ अगरबत्त्यांचे अनेक बॉक्स आढळून आले. धूप छांव कंपनी कडे परवाना तसेच CIBRC मान्यता या दोन्ही गोष्टी नसल्यामुळे, कीटकनाशके अधिनियम, 1968 आणि कीटकनाशके नियम, 1971 अंतर्गत या उत्पादनाचे उत्पादन व विक्री बेकायदेशीर ठरते.

हर्बल असल्याचा खोटा दावा करत अनेक बेकायदेशीर अगरबत्त्या विक्रीस आणल्या जात असून, त्यामध्ये बेकायदेशीर आणि शासनमान्य नसलेली रसायने वापरली जात आहेत. ‘कॉम्फर्ट’, ‘स्लीपवेल’ आणि ‘रिलॅक्स’ या नावांनी विक्री होणारी उत्पादने यामध्ये ओळखली गेली आहेत. यामुळे भारतभर मान्यता नसलेली कीटकनाशके असलेल्या बेकायदेशीर डास प्रतिबंधक अगरबत्त्यांविरोधात अंमलबजावणी कारवाईत वाढ झाली असून, नियामक सतर्कता आणि सार्वजनिक आरोग्याबाबतची चिंता अधिक तीव्र होत असल्याचे दिसून येते.

कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालय यांच्या अंतर्गत कार्यरत असलेली केंद्रीय कीटकनाशक मंडळ व नोंदणी समिती (CIBRC) ही वैधानिक संस्था असून, भारतात डास प्रतिबंधकांमध्ये वापरल्या जाणाऱ्या रसायनांना उत्पादन, आयात किंवा विक्रीपूर्वी मंजुरी व नोंदणी देण्याची जबाबदारी त्यांच्यावर आहे. शासनमान्य CIBRC-मान्यताप्राप्त डास प्रतिबंधक उत्पादनांवर नोंदणी क्रमांक (CIR – Central Insecticide Registration number पासून सुरू होणारा) पॅकवर स्पष्टपणे नमूद केलेला असतो. त्यामुळे ग्राहकांना उत्पादनाची सत्यता तपासता येते आणि सुरक्षित उत्पादने निवडता येतात.

डाइमफ्लुथ्रिन आणि मेपरफ्लुथ्रिन यांसारखी रसायने CIBRC कडून मंजूर नसल्यामुळे, त्यांचा डास प्रतिबंधक अगरबत्त्यांमध्ये वापर करणे हा बेकायदेशीर प्रकार आहे. तसेच, कोणतेही शासनमान्य डास प्रतिबंधक उत्पादन CIBRC कडून मंजुरी मिळण्यापूर्वी कठोर चाचणी प्रक्रियेतून जाते.

या घडामोडींवर प्रतिक्रिया देताना होम इन्सेक्ट कंट्रोल असोसिएशन (HICA)चे मानद सचिव जयंत देशपांडे म्हणाले, “कॉम्फर्टसारख्या बेकायदेशीर डास प्रतिबंधक अगरबत्त्यांविरोधात महाराष्ट्र सरकारने वेळेवर केलेल्या ठोस कारवाईचे आम्ही मनापासून कौतुक करतो. अगरबत्ती स्वरूपातील प्रतिबंधकांमध्ये डाइमफ्लुथ्रिनसारख्या बेकायदेशीर व मान्यता नसलेल्या रसायनांचा गैरवापर होणे अत्यंत चिंताजनक असून यामुळे सार्वजनिक आरोग्याला संभाव्य धोका निर्माण होऊ शकतो. अशा उत्पादनांची जाणीवपूर्वक कोणतीही नियामक मंजुरी न घेता विक्री केली जाते आणि ग्राहकांमध्ये ती उत्पादने सुरक्षित असल्याचा गैरसमज निर्माण केला जातो. ही कारवाई नकळत बनावट डास प्रतिबंधक अगरबत्त्या खरेदी करणाऱ्या लोकांच्या हितासाठी आहे. या सरकारी कारवाईमुळे बेकायदेशीर उत्पादक आणि त्यांच्या वितरणास मदत करणाऱ्यांना सहन केले जाणार नाही, असा स्पष्ट संदेश मिळतो. आम्ही सर्व राज्यांमध्ये सातत्यपूर्ण कारवाईची मागणी करतो आणि ग्राहकांना केवळ वैध CIBRC नोंदणी क्रमांक असलेली डास प्रतिबंधक उत्पादनेच खरेदी करण्याचा सल्ला देतो.”

गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात आंध्र प्रदेशातील विजयवाडा येथे अंमलबजावणी अधिकाऱ्यांनी ‘स्लीपवेल’ या ब्रँड नावाखाली विक्री होणाऱ्या 69 लाख रु. किमतीच्या बेकायदेशीर डास प्रतिबंधक अगरबत्त्या जप्त केल्या होत्या. या अगरबत्त्यांमध्ये मेपरफ्लुथ्रिन आढळून आले होते. हे केंद्रीय कीटकनाशक मंडळ व नोंदणी समिती (CIBRC) कडून मंजूरी नसलेले कीटकनाशक आहे.

होम इन्सेक्ट कंट्रोल असोसिएशन (HICA) नियामक संस्था आणि अंमलबजावणी यंत्रणांसोबत निकट सहकार्य सुरू ठेवेल. त्यायोगे बेकायदेशीर उत्पादनांविरोधात कारवाईला पाठबळ देता येईल आणि ग्राहकांना सुरक्षित व नियमांचे पालन करणाऱ्या घरगुती कीटक नियंत्रण उपायांची ओळख करून देता येईल.KK/ML/MS

Milind

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *