लोकसभेत गदारोळ, आठ खासदारांचे निलंबन

 लोकसभेत गदारोळ, आठ खासदारांचे निलंबन

नवी दिल्ली, दि. ३ : संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशना दरम्यान आज लोकसभेत विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या भाषणादरम्यान मोठा गोंधळ झाला. यावेळी काही खासदारांनी टेबलावर चढून सभापतींच्या व्यासपीठावर कागदपत्रे फेकली. यामुळे सभागृहात गदारोळ निर्माण झाला होता. यानंतर लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी या खासदारांवर कडक कारवाई केली आहे. सभापतींनी अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या उर्वरित कालावधीसाठी आठ विरोधी खासदारांना निलंबित केले आहे. हे सर्व खासदार आता अर्थसंकल्पीय अधिवेशनात सहभागी होऊ शकणार नाहीत. या निलंबन करण्यात आलेल्या खासदारांमध्ये महाराष्ट्रातील एका खासदार प्रशांत पडोळे यांचा समावेश आहे.

लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी अमरिंदर सिंग राजा वारिंग, डीन कुरियाकोसे, किरण कुमार रेड्डी, माणिकम टागोर, गुरजीत सिंग औजला, हिबी एडन, एस. वेंकटेश्वरन आणि प्रशांत पडोळे यांना उर्वरित अधिवेशातील कामकाजासाठी निलंबित केले आहे. यातील प्रशांत पडोळे हे महाराष्ट्रातील भंडाऱ्याचे खासदार आहेत. सभागृहात कागदपत्रे फेकल्याबद्दल आणि सभापतींच्या व्यासपीठाचा अनादर केल्यामुळे या खासदारांना निलंबित करण्यात आले आहे.

लोकसभेचे विरोधीपक्षनेते राहुल गांधी यांनी चीनचा मुद्दा उपस्थित केल्यानंतर सभागृहात वाद निर्माण झाला होता. यामुळे आज सकाळी संसदेचे कामकाज विस्कळीत झाले होते. दुपारी 2 वाजता कामकाज पुन्हा सुरू झाले तेव्हा राहुल गांधींनी त्यांचे भाषण सुरू केले. त्यांनी पुन्हा चीन-अमेरिका कराराचा मुद्दा उपस्थित केल्याने गोंधळ उडाला. सभापतींनी राहुल यांना राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावावर बोलण्यास वारंवार सांगितले. मात्र राहुल गांधी चीनचा मुद्दा उपस्थित करत राहिले. त्यानंतर सभापतींनी त्यांना बोलण्याची परवानगी नाकारली, त्यामुळे मोठा गोंधळ उडाला. या गोंधळादरम्यान विरोधी पक्षाचे खासदार टेबलांवर चढले आणि काही खासदारांनी सभापतींच्या व्यासपीठाकडे कागदपत्रे फेकण्यास सुरुवात केली. यामुळे मोठा गोंधळ निर्माण झाला. आता या गोंधळ घालणाऱ्या खासदारांना निलंबित करण्यात आले आहे.

काँग्रेस खासदार केसी वेणुगोपाल यांनी म्हटले की, राहुल गांधी त्यांचे कर्तव्य बजावत आहेत आणि सरकार त्यांना अडथळा आणत आहे. सरकारने केवळ सर्व काँग्रेस खासदारांनाच नाही तर संपूर्ण विरोधी पक्षातील खासदारांना निलंबित करावे.’ दरम्यान खासदारांचे निलंबन झाल्यानंतर केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी खासदारांच्या निलंबनाबाबत लोकसभा अध्यक्षांची भेट घेतली असल्याचीही माहिती समोर आली आहे.

SL/ML/SL

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *