टोल प्लाझावर आता रोख रकमेवर बंदी
मुंबई,दि. ८ : रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने टोल नियमांमध्ये सुधारणा करणारी एक राजपत्र अधिसूचना जारी केली आहे. यानुसार, टोल प्लाझावर १० एप्रिलपासून रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही. आता सर्व टोल व्यवहार डिजिटल पद्धतीने केले जातील. यासाठी फास्टॅग (FASTag) असणे आवश्यक आहे. फास्टॅग नसल्यास तुम्ही ऑनलाइन पेमेंट करू शकता. मात्र, या पद्धतीने पेमेंट करणे थोडे महाग असू शकते.
वाहनाला फास्टॅग नसेल किंवा तो सक्रिय केलेला नसेल, तर चालक यूपीआय (UPI) वापरून पेमेंट करू शकतील. मात्र, यासाठी अतिरिक्त टोल शुल्क लागेल. यूपीआय वापरून पेमेंट केल्यास सामान्य टोल शुल्कापेक्षा २५% जास्त खर्च येईल. टोल शुल्क 100 रुपये असेल तर UPI वापरून पैसे भरल्यास 125 रुपये भरावे लागतील.
चालकाने FASTag आणि UPI दोन्ही वापरून टोल भरण्यास नकार दिला, तर टोल कर्मचारी राष्ट्रीय महामार्ग शुल्क नियमांनुसार त्यांना पुढे जाण्यापासून थांबवू शकतात. अशा परिस्थितीत, वाहन मालकाला ई-नोटीस देखील पाठवली जाऊ शकते. थकबाकीची रक्कम तीन दिवसांच्या आत भरली नाही, तर टोलची रक्कम दुप्पट केली जाऊ शकते.
SL/ML/SL