ब्लॅक मंडे: भारतीय शेअर बाजारात ‘हाहाकार’! सेन्सेक्स १९०० अंकांनी कोसळला;
जितेश सावंत
भारतीय शेअर बाजारासाठी आजचा सोमवार खऱ्या अर्थाने ‘ब्लॅक मंडे’ (Black Monday) ठरला आहे. जागतिक स्तरावर अमेरिका आणि इराण यांच्यातील युद्धजन्य परिस्थितीमुळे गुंतवणूकदारांमध्ये भीतीचे प्रचंड वातावरण पसरले असून, सेन्सेक्स १९०० अंकांनी गडगडला. तर निफ्टीत २.३ टक्के घसरण झाली.
विशेष म्हणजे, अमेरिका-इराण संघर्ष सुरू झाल्यापासून निफ्टी आतापर्यंत आपल्या उच्चांकावरून १४ टक्क्यांनी खाली घसरला आहे.तसेच मिडकॅप इंडेक्स मध्ये (Midcap Index): -१३% घसरण, रुपया (Rupee): -४% घसरण (८९.८८ वरून थेट ९३.९४ पर्यंत) ,१०-वर्षीय बाँड यील्ड: ६.५९ वरून ६.८४ पर्यंत वाढ,ब्रेंट क्रूड (Brent): $६१ वरून थेट $११४ प्रति बॅरलपर्यंत मोठी वाढ,सोने (Gold): ₹१.३५ लाख वरून ₹१.३३ लाख प्रति १० ग्रॅमपर्यंत घसरण,चांदी (Silver): ₹२.३६ लाख वरून ₹२.००७ लाख प्रति किलोपर्यंत घसरण
बाजार कोसळण्यामागची ६ प्रमुख कारणे:
१. कच्च्या तेलाचा भडका (Crude Oil @ $113):
जागतिक बाजारात ब्रेंट क्रूडचा दर प्रति बॅरल ११२.९ डॉलर्सवर पोहोचला आहे. इराणने ‘स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ’ बंद करण्याची आणि ऊर्जा केंद्रांवर हल्ले करण्याची धमकी दिल्यामुळे तेल पुरवठा विस्कळीत होण्याची भीती आहे. भारतासारख्या मोठ्या आयातदार देशासाठी हे अत्यंत घातक असून यामुळे महागाई आणि चालू खात्यातील तूट (CAD) वाढण्याची शक्यता आहे.
२. परकीय गुंतवणूकदारांची (FPI) विक्रमी विक्री:
परकीय गुंतवणूकदारांनी भारतीय बाजारातून अक्षरशः पळ काढला आहे. मार्च महिन्यात २० तारखेपर्यंत तब्बल ९०,१५२ कोटी रुपयांची विक्री झाली असून, आजही तासाला १,००० कोटी रुपये या वेगाने विक्री सुरू आहे. देशांतर्गत बाजारातील कमी परतावा आणि जागतिक अनिश्चितता यामुळे हा कल वाढला आहे.
३. ‘इंडिया विक्स’ (India VIX) मध्ये १५% उसळी:
बाजारातील भीतीचा निर्देशांक ‘India VIX’ आज १५ टक्क्यांनी वाढून २६ च्या पातळीवर पोहोचला आहे. जून २०२४ नंतरची ही सर्वोच्च पातळी आहे. हा निर्देशांक वाढणे म्हणजे गुंतवणूकदारांमध्ये वाढलेली असुरक्षितता आणि नजीकच्या काळात येणारी मोठी अस्थिरता होय.
४. अमेरिका-इराण युद्ध आणि भू-राजकीय तणाव:
इराण आणि अमेरिका यांच्यातील संघर्ष आता चौथ्या आठवड्यात प्रवेश करत आहे. इराणने अमेरिकेच्या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून प्रादेशिक ऊर्जा आणि पाणी पायाभूत सुविधांवर हल्ले करण्याची धमकी दिली आहे. युद्धाचा कालावधी आणि परिणाम याबद्दल स्पष्टता नसल्यामुळे बाजार दबावाखाली आहे.
५. कमकुवत जागतिक संकेत (Weak Global Cues):
केवळ भारतच नव्हे, तर आशियाई बाजारपेठांमध्येही मोठी पडझड झाली आहे. दक्षिण कोरियाचा ‘कोस्पी’ (Kospi) ६%, तर जपानचा ‘निक्केई’ (Nikkei) ४.६% नी कोसळला आहे. अमेरिकन बाजारपेठांमधील शुक्रवारी झालेली घसरण आणि आजचे वॉल स्ट्रीट फ्युचर्स (१.५% डाऊन) यामुळे जागतिक विक्रीचा सपाटा सुरू आहे.
६. रुपयाची ऐतिहासिक नीचांकी पातळी (Rupee @ 93.94):
डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपया आज ४१ पैशांनी घसरून ९३.९४ या आतापर्यंतच्या सर्वात नीचांकी पातळीवर पोहोचला आहे. कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती आणि परकीय निधीचा ओघ बाहेर जात असल्याने रुपयावर मोठा दबाव निर्माण झाला आहे.
या पडझडीमुळे शेअर बाजारातील गुंतवणूकदारांचे काही तासांतच लाखो कोटी रुपये बुडाले आहेत. बँकिंग, आयटी आणि ऑटो क्षेत्रातील दिग्गज शेअर्सना आज मोठी झळ बसली आहे. जोपर्यंत युद्धाच्या आघाडीवर तणाव निवळत नाही, तोपर्यंत बाजारातील ही घसरण कायम राहू शकते. गुंतवणूकदारानी प्रत्येक पडझडीचा लाभ घ्यावा आणि दीर्घकालीन गुंतवणुकीला प्राधान्य द्यावे.
लेखक, शेअर बाजार, अर्थविषयक घडामोडी, सायबर कायदा तसेच डेटा प्रोटेक्शन कायदा तज्ज्ञ आहेत.
The author is an expert in the stock market, financial affairs, cyber law, and data protection law.
ईमेल:jiteshsawant33@gmail.com
ML/ML/MS