बेस्ट’ला बळकटी देण्यासाठी पालिकेची
कटिबद्धता
कर्मचाऱ्यांच्या देणीप्रश्नी महापौर संवेदनशील

 बेस्ट’ला बळकटी देण्यासाठी पालिकेचीकटिबद्धताकर्मचाऱ्यांच्या देणीप्रश्नी महापौर संवेदनशील

मुंबई. : बृहन्मुंबई विद्युत पुरवठा व परिवहन (बेस्ट) उपक्रम आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी महानगरपालिका प्रशासन कटिबद्ध असून, सेवानिवृत्त कामगार व कर्मचाऱ्यांचे उपदान (ग्रॅच्युइटी) व इतर कायदेशीर देणी देण्याबाबत प्रशासन संवेदनशील आहे, असे प्रतिपादन महापौर रितू तावडे यांनी केले.

बेस्ट उपक्रमातील कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांबाबतची संयुक्त सभा शुक्रवारी बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालयातील स्थायी समिती सभागृहात पार पडली. या बैठकीत कार्यरत व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी उपदान, वेतन करार, पदोन्नती, अनुकंपा तत्वावरील भरती, स्वमालकीच्या बसांचा ताफा वाढविणे आणि आर्थिक सहाय्य या महत्त्वाच्या विषयांवर विचारविनिमय झाला. दि बी.ई.एस.टी. वर्कर्स युनियन तसेच बेस्ट संयुक्त कामगार कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधत महापौरांनी त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या आणि त्या सोडविण्याबाबत सकारात्मक भूमिका घेतली.
महापौर तावडे यांनी सांगितले की, ‘बेस्ट’ ही मुंबईतील सार्वजनिक वाहतूक व वीज पुरवठ्याची महत्त्वाची जीवनवाहिनी असून देशातील प्रमुख नागरी परिवहन सेवांपैकी एक आहे. या उपक्रमाला आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी करण्यासाठी ठोस व दीर्घकालीन उपाययोजना राबविणे आवश्यक आहे. विशेषतः बेस्टकडे स्वतःच्या मालकीच्या बसचा ताफा वाढविणे ही काळाची गरज असून त्या दृष्टीने नियोजनबद्ध पावले उचलली जातील.
तसेच बेस्ट प्रशासनाने आर्थिक शिस्त, उत्पन्नवाढ आणि कार्यक्षमता वाढविण्यावर लक्ष केंद्रित करावे, प्रभावी उपाययोजना तयार करून त्यांची काटेकोर अंमलबजावणी करावी, असे निर्देशही महापौरांनी दिले.
या बैठकीस उपमहापौर संजय घाडी, सभागृहनेते गणेश खणकर, स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे, शिवसेना गटनेते अमेय घोले, बेस्ट समिती अध्यक्षा तृष्णा विश्वासराव, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी यांच्यासह बेस्टचे अधिकारी व कामगार संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.JS/ML/MS

Milind

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *