सार्वजनिक ठिकाणी विनापरवानगी बॅनर्स प्रदर्शित करणाऱ्यांविरोधात बृहन्मुंबई महानगरपालिकेची कठोर कारवाई
मुंबई, 23
बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाने महानगरपालिका हद्दीत तात्पुरत्या स्वरूपातील जाहिराती प्रदर्शित करण्यासाठी जागा उपलब्ध करून दिलेल्या असतांनाही काही संस्था, संघटना आणि व्यावसायिकांकडून रस्त्यांच्या दुतर्फा असलेल्या विजेच्या खांबांवर अनधिकृतपणे बॅनर्स लावण्यात येत आहेत. अशा संस्था, संघटना आणि व्यावसायिकांविरोधात अनुज्ञापन खात्याकडून गावदेवी, मलबार हिल, डॉ. डी. बी मार्ग पोलिस स्थानकात अनोळखी व्यक्तिविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिनांक २१ आणि २२ जानेवारी २०२६ या दोन दिवसांत ही कारवाई करण्यात आली. या कारवाईत एकूण ४१ बॅनर्स निष्कासित करण्यात आले. महानगरपालिकेने मंजुरी दिलेल्या ठिकाणीच परवानगी घेवून जाहिराती प्रदर्शित कराव्यात, असे आवाहनही महानगरपालिकेच्या अनुज्ञापन खात्याने केले आहे. तसेच यापुढेही सार्वजनिक ठिकाणी विनापरवाना बॅनर्स, फलक, पोस्टर्स लावणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई सुरू राहणार असल्याचे महानगरपालिकेकडून स्पष्ट करण्यात येत आहे.
बृहन्मुंबई महानगरपालिका उप आयुक्त (विशेष) श्रीमती चंदा जाधव मार्गदर्शनाखाली अनुज्ञापन खात्याकडून ही कारवाई करण्यात आली. महानगरपालिकेच्या डी विभागातील डॉ. गोपाळराव देशमुख मार्ग (पेडर रोड), पंडिता रमाबाई मार्ग, भुलाभाई देसाई मार्ग, वाळकेश्वर, मलबार हिल, डॉ. दादासाहेब भडकमकर मार्ग, मौलाना शौकत अली मार्ग, सरदार वल्लभभाई पटेल मार्ग तसेच राजा राममोहन रॉय मार्ग या ठिकाणी अनुज्ञापन खात्याकडून निष्कासन कारवाई करण्यात आली. तसेच गावदेवी, मलबार हिल, डॉ. दादासाहेब भडकमकर मार्ग या तीन पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्याबाबतचे प्रथम खबरी अहवाल (एफआयआर) सादर करण्यात आले आहेत. त्यानुसार संबंधित पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
माननीय उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार, महानगरपालिका हद्दीतील सार्वजनिक ठिकाणी विनापरवाना कोणतेही फलक, बॅनर, पोस्टर प्रदर्शित करण्यास मनाई आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रातील सार्वजनिक रस्ते तसेच पदपथांवर महानगरपालिकेच्या पूर्व परवानगीशिवाय कोणत्याही विषयाचे जाहिरात फलक (होर्डिंग), बॅनर किंवा पोस्टर लावण्यास प्रतिबंध आहे. अशा प्रकारच्या विना परवानगी जाहिरात फलक, बॅनर, पोस्टर लावणाऱ्या व्यक्ती किंवा संस्थेविरोधात ‘महाराष्ट्र मालमत्ता विद्रुपीकरण प्रतिबंधक कायदा-१९९५’ मधील तरतुदी तसेच ‘मुंबई महानगरपालिका अधिनियम १८८८’मधील कलम ३२८/३२८-अ, ४७१ अन्वये कायदेशीर कारवाई करण्याची तरतूद आहे. या तरतुदींचा भंग करताना आढळल्यास संबंधितांवर गुन्हा दाखल करणे तसेच न्यायालयीन दावा दाखल करणे या कायदेशीर कारवाईंचा समावेश असल्याची माहिती अनुज्ञापन विभागाने दिली आहे.
टोल फ्री क्रमांकावर तक्रार करण्याची सुविधा
विनापरवाना आणि अनधिकृत जाहिरात फलक (होर्डिंग) तसेच बॅनरविरोधात तक्रार नोंदविण्यासाठी नागरिकांनी १९१६ या टोल-फ्री क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे. विनापरवाना प्रदर्शित केलेल्या जाहिरात फलकांविरोधात तक्रार नोंदविण्याची सुविधा महानगरपालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर www.mcgm.gov.in आणि @mybmc या समाजमाध्यमांवरही उपलब्ध आहे.KK/ML/MS