बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या बालकोत्सवातून विद्यार्थ्यांमधील कलागुणांना वाव
मुंबई, दि ४
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगतीसह क्रीडा, कला, सांस्कृतिक क्षेत्रातील सहभाग कौतुकास्पद आहे. बालकोत्सवासारख्या उपक्रमांत त्याचे प्रतिबिंब उमटते. दिव्यांग व विशेष विद्यार्थ्यांनी सादर केलेले कोळीनृत्य मनाला भिडले. इतर विद्यार्थ्यांइतकेच आपणही सरस आहोत, हे त्यांनी दाखवून दिले. बालकोत्सव आणि पथनाट्य अशा उपक्रमांतून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना आणखी वाव मिळेल, असे उद्गार मुंबईच्या महापौर श्रीमती रितू तावडे यांनी काढले.
‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे बालकोत्सव व पथनाट्य स्पर्धा बक्षीस वितरण समारंभ विलेपार्ले (पूर्व) येथील मास्टर दीनानाथ मंगेशकर नाट्यगृहात आज (दिनांक ४ मार्च २०२६) पार पडला. त्यावेळी अध्यक्षस्थानावरुन महापौर श्रीमती रितू तावडे बोलत होत्या.
उप महापौर श्री. संजय घाडी, विरोधी पक्षनेता श्रीमती किशोरी पेडणेकर, शिक्षण समिती अध्यक्ष श्रीमती राजेश्री शिरवडकर, स्थानिक नगरसेवक श्री. मिलिंद शिंदे, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अविनाश ढाकणे, उप आयुक्त (शिक्षण) डॉ. (श्रीमती) प्राची जांभेकर, शिक्षणाधिकारी श्रीमती सुजाता खरे, शिक्षणाधिकारी श्री. कीर्तीवर्धन किरीतकुडवे यांच्यासह विविध अधिकारी, शिक्षक, विद्यार्थी, पालक आदी याप्रसंगी उपस्थित होते.
महापौर श्रीमती तावडे म्हणाल्या, आजच्या मुलांचा कल डॉक्टर, इंजिनिअर किंवा अधिकारी होण्याकडे आहे. आपल्या आवडीच्या क्षेत्रात यश मिळविण्यासाठी मुलांनी कला, नाट्य, संगीत, चित्रकला, क्रीडा यांचीही आवड जपायला हवी. या स्पर्धेत शिक्षकांनी खूप परिश्रम घेतले. शिक्षक हा विद्यार्थ्यांचा कणा असतो. शिक्षणासोबत मुलांच्या आवडी जपणे, त्यांच्या कलागुणांना वाव देणे हे कार्य देखील शिक्षक करतात. बालकोत्सव देखील या कार्यात मोठी भर घालतो, असेही श्रीमती तावडे म्हणाल्या. यावेळी श्रीमती तावडे यांनी शिक्षण समिती अध्यक्ष असतांनाच्या आठवणींनाही उजाळा दिला.
उपमहापौर श्री. संजय घाडी म्हणाले, बालकोत्सवमधील मुलांचा उत्साह कौतुकास्पद आहे. मी देखील बृहन्मुंबई महानगरपालिका शाळांमधून शिक्षण घेतलेला विद्यार्थी आहे. महानगरपालिका शाळेत विद्यार्थी घडतात. अशा स्पर्धांमधून मुलांचा सर्वांगीण विकास होतो. आजचा कार्यक्रम खासगी शाळांनाही मागे टाकणारा आहे, असे ते म्हणाले.
शिक्षण समिती अध्यक्षा श्रीमती राजेश्री शिरवडकर म्हणाल्या, बृहन्मुंबई महानगरपालिकेचा बालकोत्सव हा खऱ्या अर्थी कलेचा, परिश्रमाचा उत्सव आहे. या व्यासपीठावर सादर झालेल्या लोकनृत्यातून संपूर्ण भारत दर्शन झाले. या सर्व लोकनृत्यांना परंपरेचा साज आणि कलेचा गंध आहे. पथनाट्यांनी सादरीकरणासह सामाजिक प्रश्नांवरही प्रकाश टाकला, असे त्यांनी नमूद केले.
उप आयुक्त डॉ. (श्रीमती) प्राची जांभेकर म्हणाल्या, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण विभागातर्फे दरवर्षी बालकोत्सव आयोजित केला जातो. शैक्षणिक अभ्यासक्रमासह विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठीचा हा उपक्रम असल्याचे त्यांनी सांगितले.
शिक्षणाधिकारी श्रीमती सुजाता खरे यांनी आभार मानले. बालकोत्सवातील अंतिम लोकनृत्य स्पर्धा व पथनाट्य स्पर्धा बक्षीस वितरण समारंभाची सुरुवात विशेष मुलांनी सादर केलेल्या कोळी नृत्याने झाली. चिमुकल्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या या नृत्याने मान्यवर आणि अधिकाऱ्यांची मने जिंकली. या विशेष मुलांच्या संघाला महापौर श्रीमती तावडे यांच्या हस्ते चषक प्रदान करून गौरव करण्यात आला. यानंतर बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या शाळांतील विद्यार्थ्यांनी विविध राज्यांतील आठ लोकनृत्यांचे सादरीकरण केले. या सादरीकरणाने रसिकांची मने जिंकली.
गायक रफी नगर उर्दू शाळेचा ‘डांगी लोकनृत्य गट’ ठरला प्रथम क्रमांकाचा मानकरी
अंतिम लोकनृत्य स्पर्धेमध्ये एम पूर्व विभागातील गायक रफी नगर उर्दू शाळेचा ‘डांगी लोकनृत्य गट’ प्रथम क्रमांकाचा विजेता ठरला. सी विभागातील गिल्डर लेन मुंबई पब्लिक स्कूल ‘पंथी लोकनृत्य गट’ द्वितीय, तर आर दक्षिण विभागातील मुंबई पब्लिक स्कूल संभाजी नगर मराठी शाळेचा ‘सडपा लोकनृत्य गट’ तृतीय क्रमांकाचा विजेता ठरला. या सर्व विजेत्यांना चषक, रोख पारितोषिक देवून गौरविण्यात आले. यासोबतच प्रत्येक गटाच्या नृत्य दिग्दर्शकांनाही गौरविण्यात आले.
पथनाट्यांतून सामाजिक प्रश्नांवर प्रकाश
पथनाट्यांमध्ये, पूनम नगर शाळेच्या संघाने ‘व्यसनमुक्ती काळाची गरज’ हे पथनाट्य सादर केले. धामणगाव मराठी शाळेच्या संघाने ‘नवीन शिक्षण धोरण गुणवत्ता विकास’, तर मेघराज शेट्टी मार्ग महानगरपालिका उर्दू शाळा शाळेच्या संघाने ‘मेरी पृथ्वी, मेरा भविष्य’ या पथनाट्याचे सादरीकरण केले. या तीनही पथनाट्य संघांना चषक प्रदान करुन गौरविण्यात आले. श्री. राहुल जाधव, श्री. अमित बाईंग आणि श्रीमती मेघना घाडगे यांनी या स्पर्धेचे परीक्षण केले.KK/ML/MS