‘भारती एअरटेल’ बनली देशातील दुसरी सर्वात मोठी कंपनी
‘एचडीएफसी’ला मागे सारून मिळवले ‘रिलायन्स’नंतरचे स्थान
मुंबई दि १९ : भारतीय शेअर बाजारात सोमवारी एक मोठी उलथापालथ पाहायला मिळाली. टेलिकॉम क्षेत्रातील दिग्गज कंपनी ‘भारती एअरटेल’ने खासगी क्षेत्रातील देशातील सर्वात मोठ्या बँकेला म्हणजेच ‘एचडीएफसी’ला मागे टाकले. बाजार भांडवलाच्या (मार्केट कॅप) बाबतीत भारती एअरटेल आता देशातील दुसरी सर्वात मोठी आणि मौल्यवान सूचीबद्ध कंपनी बनली आहे. सोमवारच्या व्यापारी सत्रादरम्यान भारती एअरटेलच्या शेअरमध्ये झालेल्या जोरदार तेजीमुळे कंपनीचे एकूण बाजार भांडवल सुमारे ११.९० लाख कोटी रुपयांवर पोहोचले, ज्याने एचडीएफसी बँकेच्या सुमारे ११.८० लाख कोटी रुपयांच्या मूल्यांकनाला मागे टाकले. या बाजार क्रमवारीत उद्योगपती मुकेश अंबानी यांची ‘रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड’ १८ लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त बाजार भांडवलासह देशात पहिल्या क्रमांकावर कायम आहे.
भारती एअरटेलच्या या ऐतिहासिक यशामागे गेल्या चार सत्रांत त्यांच्या शेअर्समध्ये झालेली ११ टक्क्यांची दमदार वाढ मुख्य कारणीभूत ठरली आहे. कंपनीने मार्चअखेरच्या तिमाहीत केलेली समाधानकारक कामगिरी, आफ्रिकेतील व्यवसायातील मजबूत वाढ, होम ब्रॉडबँड क्षेत्राचा विस्तार आणि प्रति ग्राहक सरासरी महसूल वाढवण्यावर कंपनीने दाखवलेला ठाम विश्वास यामुळे गुंतवणूकदारांचा एअरटेलवरील आत्मविश्वास वाढला आहे. याउलट, चालू वर्ष २०२६ मध्ये एचडीएफसी बँकेच्या शेअर्समध्ये तब्बल २३ टक्क्यांची मोठी घसरण झाली आहे. बँकेचे अर्धवेळ अध्यक्ष अतनू चक्रवर्ती यांच्या अचानक झालेल्या राजीनाम्यामुळे निर्माण झालेली अनिश्चितता, अंतर्गत आव्हाने आणि विलीनीकरणानंतर सुस्तावलेली कामगिरी यामुळे एचडीएफसी बँक तिसऱ्या क्रमांकावर घसरली असून एअरटेलने दुसऱ्या स्थानावर कब्जा मिळवला आहे.ML/ML/MS