तीन वर्षांत ५२४ मुलांना जन्म दाखला नाही; पालिकेच्या हलगर्जी कारभारावर खासदार संजय दिना पाटील संतप्त.
मुंबई, दि. १९ – मुंबई महापालिकेच्या हलगर्जी व निष्काळजी कारभारामुळे शिवाजीनगर परिसरातील तब्बल ५२४ मुलांना गेल्या तीन वर्षांपासून जन्म नोंदणी दाखले मिळाले नसल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. जन्मानंतर रुग्णालयांकडून आवश्यक कागदपत्रे पालिकेकडे वेळेत पाठविण्यात आली असतानाही पालिकेच्या दिरंगाईमुळे शेकडो कुटुंबांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.

चेंबूर पश्चिम येथील पालिकेच्या कार्यालयात ईशान्य मुंबई महाविकास आघाडीचे खासदार संजय दिना पाटील यांच्या उपस्थितीत विविध विभागांच्या अधिकाऱ्यांची बैठक पार पडली. या बैठकीत जन्म नोंदणी दाखल्याचा गंभीर प्रश्न उपस्थित करण्यात आला. यावेळी पालिका, पोलीस, एसआरए, एमएमआरडीए व म्हाडा विभागाचे अधिकारी उपस्थित होते. बैठकीदरम्यान शिवाजीनगर परिसरातील ५२४ मुलांचे जन्म दाखले अद्याप प्रलंबित असल्याची बाब समोर आली. विशेष म्हणजे, हा विषय मांडल्यानंतर काही अधिकाऱ्यांनी त्याकडे किरकोळ प्रश्न म्हणून पाहत दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न केल्याचेही समजते. मात्र खासदार संजय दिना पाटील यांनी याबाबत तीव्र नाराजी व्यक्त करत संबंधित अधिकाऱ्यांना जाब विचारला. त्यानंतरच प्रशासनाने प्रकरणावर कार्यवाही सुरू असल्याचे सांगत खुलासा केला.
अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, जन्म नोंदणीस एक वर्षांपेक्षा अधिक कालावधी उलटल्यानंतर तहसीलदारांकडून ना हरकत प्रमाणपत्र घेणे आवश्यक असते. त्या प्रक्रियेचे काम सुरू असल्याचे सांगण्यात आले. मात्र तीन वर्षांपासून इतक्या मोठ्या प्रमाणात प्रकरणे प्रलंबित राहणे हे पालिकेच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण करणारे असल्याची चर्चा स्थानिकांमध्ये आहे. या संपूर्ण प्रकरणात पालिकेचे संबंधित विभाग, शताब्दी रुग्णालय तसेच एम-पूर्व विभाग कार्यालय यांनी वारंवार एकमेकांकडे बोट दाखवत जबाबदारी टाळल्याचा आरोप होत आहे. प्रशासनातील समन्वयाचा अभाव व अधिकाऱ्यांची उदासीनता याचा थेट फटका सामान्य नागरिकांना बसत आहे. जन्म दाखला हा शालेय प्रवेश, शासकीय योजना व ओळखपत्रांसाठी अत्यंत महत्त्वाचा दस्तऐवज असताना पालिकेने त्याकडे केलेले दुर्लक्ष संतापजनक असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे. खासदार संजय दिना पाटील यांनी संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने कार्यवाही पूर्ण करून सर्व प्रलंबित जन्म नोंदणी दाखले नागरिकांना देण्याच्या सूचना दिल्या असून, या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज असल्याचे स्पष्ट केले.ML/ML/MS