आयआयएमयूएनच्या परिसंवादात खासदार संजय दिना पाटील यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

 आयआयएमयूएनच्या परिसंवादात खासदार संजय दिना पाटील यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

मुंबई, दि. १६ (प्रतिनिधी) – राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर विद्यार्थ्यांसाठी कार्य करणाऱ्या ‘इंडिया इंटरनॅशनल मूव्हमेंट टू युनायटेड नेशन्स’ अर्थात आयआय एमयूएन या संस्थेच्या परिसंवादासाठी ईशान्य मुंबई महाविकास आघाडीचे खासदार संजय दिना पाटील यांना प्रमुख मार्गदर्शक म्हणून आमंत्रित करण्यात आले होते. ऑपेरा हाऊस येथे आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना सामाजिक, राजकीय, वैद्यकीय व प्रशासकीय क्षेत्रातील अनुभवांच्या माध्यमातून मार्गदर्शन करत त्यांनी युवकांना नेतृत्व, शिस्त, ध्येय व समाजसेवेचे महत्त्व पटवून दिले.

आयआयएमयूएन ही संस्था शाळा व महाविद्यालयांमध्ये मॉडेल युनायटेड नेशन्स परिषदांचे आयोजन करून विद्यार्थ्यांना नेतृत्व, सार्वजनिक वक्तृत्व, चर्चासत्र आणि निर्णयक्षमता विकसित करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देते. विविध सामाजिक, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय विषयांवर चर्चांचे आयोजन करून युवकांमध्ये लोकशाही, शांतता, सहकार्य व जागतिक दृष्टीकोन निर्माण करण्याचे कार्य ही संस्था करते.

तसेच प्रशासकीय, सामाजिक, राजकीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रातील संधींबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून युवा नेतृत्व घडविण्याचे काम संस्था सातत्याने करत आहे. या परिसंवादात खासदार संजय दिना पाटील यांनी आपल्या विद्यार्थी जीवनापासून ते लोकसभा निवडणुकीपर्यंतच्या राजकीय व सामाजिक प्रवासाची माहिती विद्यार्थ्यांसमोर मांडली. युवकांनी विद्यार्थी संघटनांमध्ये सक्रिय सहभाग घेतल्यास नेतृत्वगुण विकसित होतात तसेच समाजकारण आणि राष्ट्रकार्यात योगदान देता येते, असे त्यांनी सांगितले. कॉलेज निवडणुकांपासून सुरू झालेला स्वतःचा प्रवास, विविध संघर्ष व त्यातून घेतलेले अनुभव यांची उदाहरणे देत त्यांनी विद्यार्थ्यांना ध्येय निश्चित करून शिस्तबद्ध पद्धतीने काम करण्याचा सल्ला दिला.

प्रत्येक संकटाला धैर्याने सामोरे जाणे, परिस्थितीला योग्य प्रकारे हाताळणे व एकमेकांच्या सहकार्याने भविष्य घडविणे हे युवकांसाठी अत्यंत आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. भविष्यातील ध्येय निश्चित करताना नियोजन, सातत्य व संयम यांचे महत्त्व त्यांनी विद्यार्थ्यांना पटवून दिले. तसेच सामाजिक कार्य करताना लोकांशी जोडले जाणे व त्यांच्या समस्या समजून घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. वैद्यकीय क्षेत्रातील अनुभव सांगताना शासकीय योजनांच्या माध्यमातून गरजू नागरिकांना मदत कशी मिळवून देता येते याची माहिती त्यांनी विद्यार्थ्यांना दिली. समाजातील दुर्बल घटकांना विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी युवकांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.

अवयवदानाच्या विषयावर बोलताना त्यांनी विद्यार्थ्यांना त्याचे सामाजिक महत्त्व समजावून सांगितले. माणसाच्या मृत्यूनंतर शरीर दफन केले जाते किंवा अग्नी दिला जातो, मात्र त्या शरीरातील अवयवांचे दान केल्यास अनेकांना नवजीवन मिळू शकते, असे सांगत त्यांनी अवयवदानाबाबत जनजागृती करण्याचे आवाहन केले. यावेळी त्यांनी आपल्या वडिलांचे, कामगार नेते माजी आमदार स्व.दिना बामा पाटील तसेच आई, माजी नगरसेविका व सामाजिक कार्यकर्त्या स्व.मनोरमा पाटील यांच्या सामाजिक व राजकीय कार्याचा उल्लेख करत त्यांच्या संघर्षमय प्रवासाची माहिती विद्यार्थ्यांना दिली. कुटुंबातून मिळालेल्या सामाजिक कार्याच्या प्रेरणेचा आपल्या जीवनावर कसा परिणाम झाला, हेही त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाला त्यांच्या कन्या व भांडुप प्रभाग क्रमांक ११४ मधील नगरसेविका राजोला संजय पाटील या देखील उपस्थित होत्या. त्यांच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या विविध सामाजिक उपक्रमांची माहितीही खासदारांनी विद्यार्थ्यांना दिली. परिसंवादाच्या शेवटी विद्यार्थ्यांना चांगले कार्य करण्यासाठी प्रेरित करत समाजकारण, राष्ट्रसेवा आणि नेतृत्वाच्या माध्यमातून देशाच्या प्रगतीत युवकांनी मोठे योगदान द्यावे, असा संदेश खासदार संजय दिना पाटील यांनी दिला.ML/ML/MS

Milind

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *