नवी मुंबई मनपाने केली वेस्ट प्लॅस्टीकपासून मजबूत बाकड्यांची निर्मिती
नवी मुंबई : नवी मुंबईत कचऱ्यातील प्लास्टिकचा पुनर्वापर करून पर्यावरणपूरक बाकडे तयार करण्याचा अभिनव उपक्रम राबविण्यात आला आहे. गॅलक्सी सरफॅक्टंट्स लिमिटेड आणि नवी मुंबई महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने तयार करण्यात आलेल्या या मजबूत प्लास्टिक बाकड्यांचे लोकार्पण आयुक्त डॉ. कैलास शिंदे आणि महापौर सुजाता पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
गेल्या आठ महिन्यांपासून शहरातील कचऱ्यातील प्लास्टिक वेगळे करून त्याचे संकलन करण्यात येत आहे. दरमहा सुमारे तीन टन प्लास्टिक जमा होत असून, आतापर्यंत २४ टन प्लास्टिकचे पुनर्प्रक्रिया करून सुमारे ९० बाकड्यांची निर्मिती करण्यात आली आहे. ही बाकडे शहरातील उद्यानांमध्ये बसविण्यात येत आहेत.
या उपक्रमात स्त्री मुक्ती संघटनाकडून कचरावेचक महिलांच्या मदतीने महत्त्वाची भूमिका बजावली जात आहे. ओल्या कचऱ्याचे खतनिर्मिती, ई-वेस्ट व्यवस्थापन तसेच मल्टीलेयर प्लास्टिकच्या पुनर्प्रक्रियेचे काम संस्थेकडून अनेक वर्षांपासून केले जात आहे. शाळा, महाविद्यालये आणि कंपन्यांमध्ये जनजागृती कार्यक्रम राबवून प्लास्टिक डंपिंगला जाण्यापासून रोखण्याचे प्रयत्नही सुरू आहेत.