विधानपरिषद निवडणुकीसाठी भाजपचे उमेदवार जाहीर

 विधानपरिषद निवडणुकीसाठी भाजपचे उमेदवार जाहीर

मुंबई दि २८ : येता दहा मे रोजी होणाऱ्या राज्यातील विधान परिषदेच्या दहा जागांसाठी भाजपाने आपल्या सहा उमेदवारांची घोषणा आज केली असून इतर पक्षांमध्ये उमेदवारीवरून चढाओढ सुरू असतानाच आपल्या उमेदवारांची घोषणा करून भाजपाने बाजी मारली आहे .

काँग्रेसच्या प्रज्ञा सातव यांनी पक्षाचा तसेच विधान परिषद सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यामुळे त्या जागेवरती पोटनिवडणूक होत आहे, तर इतर नऊ सदस्य नियत कालमर्यादेमुळे निवृत्त झाल्यामुळे तिथे निवडणूक होत आहे. निवृत्त झालेल्या नऊ अधिक राजीनामा दिलेली एक अशा दहा जागांसाठी येत्या 10 मे रोजी निवडणूक होणार आहे .

निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार 23 एप्रिल ते 30 एप्रिल च्या दरम्यान या जागांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करायचे आहेत. त्यानंतर गरज वाटल्यास दहा तारखेला मतदान घेण्यात येईल . रिक्त झालेल्या नऊ जागांपैकी पाच जागा भाजपाच्या वाट्याला येणार असून दोन जागा शिवसेना शिंदे गटाला तर एक जागा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला आणि केवळ एक जागा महाविकास आघाडीच्या वाट्याला येणार आहे.

विधानसभेतील संख्याबळ पाहता निवडणूक बिनविरोध करायची असेल तर अशा पद्धतीनेच जागावाटप होऊ शकेल. त्यासोबतच काँग्रेसच्या सदस्य असणाऱ्या प्रज्ञा सातव यांनी विधान परिषद सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यामुळे त्यांच्या जागेसाठी देखील पोटनिवडणूक होत आहे.
काँग्रेसचे नेते असणाऱ्या दिवंगत राजीव सातव यांच्या पत्नी प्रज्ञा सातव यांनी काँग्रेसची साथ सोडून भाजपात प्रवेश केल्यानंतर भाजपाने त्यांना पोटनिवडणुकीसाठी पुन्हा उमेदवारी जाहीर केली आहे तर उर्वरित पाच जागांसाठी संजय भेंडे, सुनील कर्जतकर, माधवी नाईक, विवेक कोल्हे, प्रमोद जठार यांची नावे आज केंद्रीय निवडणूक समितीने जाहीर केली आहेत.

जाहीर करण्यात आलेल्या उमेदवारांमध्ये बहुतांश जण हे भाजपाचे जुने कार्यकर्ते आहेत. यामुळे जुन्या कार्यकर्त्यांवर होत असलेला अन्याय काही प्रमाणामध्ये दूर करण्याचा आणि अंतर्गत नाराजी शमवण्याचा प्रयत्न यानिमित्ताने भाजपाने केलेला दिसून आला आहे.

दुसरीकडे महाविकास आघाडीत उद्धव ठाकरे यांना उमेदवारी द्यायची की अन्य कोणाला, यावरून अद्याप खल सुरू आहे. तर शिवसेना शिंदे गटात डॉक्टर नीलम गोऱ्हे आणि बच्चू कडू यांच्या नावाची चर्चा असली तरी या दोन्ही नावांना पक्षांतर्गतच विरोध आहे. राष्ट्रवादी अजित पवार पक्षाकडून नेमकी कोणाला उमेदवारी जाहीर होते याकडे या निमित्ताने सगळ्यांचे लक्ष लागले आहे. पुढील दोन दिवसात या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करायचे आहेत.

ML/ML/SL

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *