Tin Can फोन : मुलांना डिजिटल व्यसनापासून दूर ठेवण्यास उपयोगी
मुंबई, दि. २८ : अमेरिकेत टिन कॅन’ (Tin Can) नावाचे एक अभिनव उपकरण वेगाने लोकप्रिय होत आहे. दिसायला पारंपारिक लँडलाईन फोनसारखे असलेले हे उपकरण आधुनिक तंत्रज्ञान आणि सुरक्षिततेचा एक उत्तम मिलाफ मानले जात असून, मुलांना डिजिटल व्यसनापासून दूर ठेवण्यासाठी ते प्रभावी ठरत आहे.
‘टिन कॅन टेक्नॉलॉजीज’ या कंपनीने विकसित केलेले हे उपकरण विशेषतः लहान मुलांसाठी तयार करण्यात आले आहे. आजच्या काळात मुले तासनतास स्मार्टफोनच्या स्क्रीनवर गेम खेळण्यात किंवा सोशल मीडिया पाहण्यात घालवतात, ज्याचा त्यांच्या मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्यावर विपरीत परिणाम होतो. ‘टिन कॅन’मध्ये कोणत्याही प्रकारचा डिस्प्ले किंवा ‘स्क्रीन’ नसल्यामुळे मुलांना स्क्रीनचे व्यसन लागत नाही, मात्र त्यांच्या संपर्काची गरज याद्वारे पूर्ण केली जाते.
हे उपकरण जरी लँडलाईनसारखे भासत असले, तरी ते अत्यंत प्रगत आहे. याचे मुख्य उद्दिष्ट पालकांशी किंवा जवळच्या व्यक्तींशी संवाद साधणे हे आहे. यामध्ये इंटरनेट ब्राउझिंग, सोशल मीडिया किंवा लक्ष विचलित करणारे ॲप्स उपलब्ध नसल्यामुळे मुले सायबर जगातील धोक्यांपासून सुरक्षित राहतात. स्मार्टफोनच्या अतिवापरामुळे होणारा डोळ्यांचा त्रास आणि एकाग्रतेचा अभाव यांसारख्या समस्यांवर हे उपकरण एक उत्तम उतारा ठरत आहे.
‘टिन कॅन’ दिसायला जुन्या काळातील फोनसारखा असला, तरी तो भिंतीवरील इलेक्ट्रिकल आउटलेटला जोडून कार्यरत होतो. यामध्ये स्पीकरफोन, स्पीड डायल आणि आन्सरिंग मशीन यांसारख्या सुविधा आहेत. दोन ‘टिन कॅन’ उपकरणांमधील कॉल पूर्णपणे विनामूल्य असून, आपत्कालीन सेवांशी संपर्क साधण्याची सोय यात आहे. पालकांनी मंजूर केलेल्या बाहेरील क्रमांकावर कॉल करण्यासाठी दरमहा १० डॉलरचे शुल्क आकारले जाते. यामुळे मुले अनावश्यक ग्रुप चॅट्स आणि सोशल मीडियाच्या व्यसनापासून दूर राहून केवळ आवश्यक लोकांशीच संवाद साधू शकतात.
SL/ML/SL