सचिन तेंडुलकरने घडवले हे क्लायमेट स्मार्ट व्हिलेज
पालघर, दि. २८ : वाडा तालुक्यातील गुहिर गावात मास्टर ब्लास्टर स सचिनच्या हस्ते गावात क्लायमेट स्मार्ट व्हिलेज प्रकल्पाचे लोकार्पण करण्यात आलं. सचिन तेंडुलकर फाऊंडेशनच्या माध्यमातून गावात हा प्रकल्प आणला गेला, यातून गावात सौर उर्जेवर नळ पाणी पुरवठा, प्रत्येक घरात विद्युत जोडणी तसंच शेतीसाठी पाण्याची योजना, पिठाची चक्की, भात भरडई, कडवा कुट्टी मशीन चालवण्यात येणार आहे.
सचिन तेंडुलकर फाऊंडेशनने वाडा तालुक्यातील गुहिर गाव सौर उर्जेच्या माध्यमातून स्वच्छ उर्जा आणि गाव पातळीवर रोजगार निर्मिती करून शाश्वत उपजीविकेचे साधन बनवण्याचा निर्धार केला होता. गुहिर गावाला क्लायमेट स्मार्ट व्हिलेज बनवून सचिन तेंडुलकर फाऊंडेशनने त्यांचा हा निर्धार पूर्ण केला. गावातील 113 कुटुंबांना सौर उर्जेने परिपूर्ण करण्यात आलं आहे.
गावाला स्वच्छ उर्जा उपलब्ध व्हावी तसंच शाश्वत उपजीविकेच्या माध्यमातून गाव सक्षम व्हावं, हा सचिन तेंडुलकर फाऊंडेशनचा उद्देश आहे. याच कार्यक्रमाच्या लोकार्पणासाठी खुद्द सचिन त्याची मुलगी सारा आणि सून सानियासोबत आला होता.
SL/ML/SL