सर्व भाषिक चालकांनी महाराष्ट्र गीत गाऊन आझाद मैदानात केले आंदोलन
मुंबई, दि २८:
कोणत्याही प्रकारच्या राजकारणाला ते बळी पडणार नाही व आमच्यात फुट पडणार नाही असा संदेश मुंबईत सर्व भाषिक कॅब,रिक्षा व टॅक्सीचालकांनी सामुहिक महाराष्ट्र गीत म्हणत दिला.मंगळवारी आझाद मैदानात चालक एकत्र आले होते.भारतीय गिग कामगार मंच अध्यक्ष डॉ.केशव क्षीरसागर यांनी आंदोलनाचे नेतृत्व केले.
सरकारमान्य दर सर्व ॲप्लिकेशनवर तात्काळ द्यावेत व बेकायदेशीर बाईक टॅक्सी सेवा बंद करावी. या मागणीसाठी २० एप्रिलपासून आझाद मैदानात चालकांनी उपोषण सुरु केले आहे.याचाच एक भाग म्हणून मंगळवारी मुंबई,पुणे,नागपूर यासह मोठ्या शहरामधून कॅब,रिक्षा व टॅक्सीचालक याठिकाणी एकत्र आले.त्यांनी सामुहिक महाराष्ट्र गीत म्हटले.तसेच ओला,उबर आणि रॅपिडो या कंपन्या परिवहन विभागाच्या आदेशांचे उल्लंघन करून राज्यभर बिनधास्तपणे कार्यरत आहेत,असा आरोप यावेळी चालकांनी केला.याकडे परिवहन विभागाने तातडीने लक्ष द्यावे,असे आवाहन करत यापुढेही चालक एकजुटीने आपल्या हक्कांसाठी लढत राहतील, असा निर्धार व्यक्त करण्यात आला.
यावेळी डॉ. केशव नाना क्षीरसागर म्हणाले,चालकांच्या यामागणीसाठी पाच चालक पुण्याहून मुंबईकडे पायी चालत आले.पण; यामागण्यावर कोणत्याही निर्णय न झाल्याने गेल्या आठवड्याभरापासून दोन -तीन चालकांनी आझाद मैदानात उपोषणाला सुरुवात केली.सरकारचे व परिवहन प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी कॅब,रिक्षा व टॅक्सी चालकांनी सामुहिक महाराष्ट्र गीत म्हटले.परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आमच्या मागण्या मान्य कराव्यात अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.KK/ML/MS