पंढरपूरच्या विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समिती जागेबद्दल १५ दिवसात अहवाल

 पंढरपूरच्या विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समिती जागेबद्दल १५ दिवसात अहवाल

मुंबई, दि. २८ : पंढरपूरच्या श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या अखत्यारीतील गोशाळेचा विस्तार करण्यासाठी यमाई तलावाजवळ आवश्यक असलेली जमीन मंदिर समितीच्या नावे करण्याबाबतचा मार्ग आता मोकळा झाला आहे. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात पार पडलेल्या बैठकीत, या जमिनीबाबतचा नवीन आणि सुधारीत प्रस्ताव १५ दिवसांच्या आत सादर करण्याचे स्पष्ट आदेश देण्यात आले आहेत.

बैठकीस महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह पंढरपूर संस्थानचे अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, भास्कर गिरीबाबा, माधवी निगडे, सोलापूरचे अतिरिक्त जिल्हाधिकारी गणेश निराळे, उपविभागीय अधिकारी सचिन इथापे, नगरपरिषद मुख्याधिकारी महेश रोकडे यांच्यासह महसूल विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या १२ हेक्टर जागेवर सध्या गोशाळा कार्यरत आहे. वाढत्या गरजा लक्षात घेता, मंदिर समितीने अतिरिक्त ३.१२ हेक्टर जागेची मागणी केली होती. यासाठी २००८ आणि २०२२ मध्ये प्रस्ताव पाठविण्यात आले होते. मात्र, सदर जमिनीच्या आरक्षणाबाबतच्या तांत्रिक अडचणींमुळे हा प्रश्न प्रलंबित होता. जमिनीच्या मूळ आरक्षणात पिकनीक स्पॉट आणि टँक डेव्हलपमेंट आदी काही तांत्रिक त्रुटींमुळे ही जागा देता येत नव्हती.
मंत्रालयात झालेल्या या बैठकीत महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जुन्या तांत्रिक वादात न अडकता, विकासाला प्राधान्य देण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत. त्यांनी स्पष्ट केले की, जुन्या आरक्षणाच्या वादात वेळ वाया घालवण्यापेक्षा, ‘पिकनीक स्पॉट’ म्हणून विकसित करण्याच्या दृष्टीने तातडीने सुधारीत प्रस्ताव तयार करावा. हा प्रस्ताव पुढील १५ दिवसांत जिल्हा प्रशासनाने शासनाकडे सादर करावा. यामुळे गोशाळेचा विस्तार होऊन भक्तांसाठी आणि गोवंशासाठी सोयीसुविधांचा दर्जा उंचावण्याचा मार्ग प्रशस्त झाला आहे.ML/ML/MS

Milind

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *