अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. विपिन शर्मा यांनी मालाड येथील मनोहर वामन देसाई रुग्णालयाचा घेतला आढावा

 अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. विपिन शर्मा यांनी मालाड येथील मनोहर वामन देसाई रुग्णालयाचा घेतला आढावा

मुंबई, दि २०
अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. विपिन शर्मा यांनी आज (दिनांक २० एप्रिल २०२६) मालाड पूर्व परिसरात असणाऱ्या बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या मनोहर वामन देसाई रुग्णालयाला भेट दिली. या भेटीदरम्यान त्यांनी रुग्णालयातील बाह्य रुग्ण विभाग, अतिदक्षता विभाग आणि रुग्णालयातील विविध विभागांना भेट दिली. या भेटीदरम्यान त्यांनी रुग्णालयात वैद्यकीय उपचारांसाठी आलेल्या रुग्णांशीही संवाद साधला. त्याचबरोबर रुग्णालयात कार्यरत असणारे डॉक्टर, परिचारिका आणि संबंधित अधिकारी व कर्मचारी यांच्याशी देखील त्यांनी संवाद साधून तेथील परिस्थितीची माहिती घेतली.

अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांच्या आजच्या दौ-या दरम्यान त्यांच्या समवेत बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या उपनगरीय रुग्णालयांचे प्रमुख वैद्यकीय अधीक्षक व खाते प्रमुख डॉक्टर चंद्रकांत पवार हे देखील उपस्थित होते. डॉक्टर शर्मा यांनी आजच्या भेटीदरम्यान रुग्णालयातील यंत्रसामग्री, रुग्णवाहिका तसेच रुग्णालयाशी संबंधित विविध बाबींचा आढावा घेऊन तेथील परिस्थिती बाबत संबंधितांशी सविस्तर चर्चा केली. तसेच डॉक्टर, परिचारिका व वैद्यकीय सेवा सुविधा देणाऱ्या संबंधित अधिकारी व कर्मचारी यांच्याशी संवाद साधताना डॉ. शर्मा यांनी आवर्जून निर्देशित केले की, रुग्णालयातील डॉक्टर आणि वैद्यकीय सेवा सुविधा देणारे संबंधित कर्मचारी या सर्वांनी रुग्णालयात वैद्यकीय उपचारांसाठी येणाऱ्या रुग्णांशी अधिकाधिक सौहार्दपूर्ण पद्धतीने संवाद साधावा आणि रुग्णांचे समुपदेशन योग्य रीतीने करावे. रुग्णालयातील स्वच्छता व सेवा सुविधा याबाबत डॉ. शर्मा यांनी समाधान व्यक्त केले.

मनोहर वामन देसाई रुग्णालय हे मालाड पूर्व परिसरात असणारे बृहन्मुंबई महानगरपालिकेचे एक महत्त्वाचे रुग्णालय आहे. १८० खाटांचे हे रुग्णालय सन १९७६ पासून मुंबईकरांना वैद्यकीय सेवा सुविधा देत आहे. या रुग्णालयाची बाह्य रुग्ण नोंदणी कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी सकाळी ८ ते ११ यादरम्यान सुरू असते, अशी माहिती देखील रुग्णालय प्रशासनाद्वारे या निमित्ताने कळविण्यात आली आहे.JS/ML/MS

Milind

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *