NEP नुसार नवीन शैक्षणिक वर्षांपासून ४ वर्षांचा पदवी अभ्यासक्रम

 NEP नुसार नवीन शैक्षणिक वर्षांपासून ४ वर्षांचा पदवी अभ्यासक्रम

मुंबई, दि. ८ : राज्य सरकारने नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार ( NEP २०२०) राज्यातील पदवी शिक्षण पद्धतीत मोठे बदल करण्यास मान्यता दिली आहे. शैक्षणिक वर्ष २०२६-२७ पासून सर्व सार्वजनिक विद्यापीठे, संलग्न महाविद्यालये आणि स्वायत्त संस्थांमध्ये चार वर्षांचे पदवी अभ्यासक्रम सुरू केले जाणार आहेत. यामध्ये विद्यार्थ्यांना ‘ऑनर्स’ आणि ‘ऑनर्स विथ रिसर्च’ (संशोधनासह ऑनर्स) अशा दोन प्रकारच्या पदव्या मिळवण्याची संधी मिळणार आहे. राज्यभर या नव्या रचनेत एकसारखेपणा राहावा आणि त्याची प्रभावी अंमलबजावणी व्हावी, या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आल्याचे याबाबत जारी केलेल्या शासन निर्णयात (जीआर) म्हटले आहे.

चार वर्षांचा हा पदवी अभ्यासक्रम आठ सत्रांमध्ये विभागलेला असेल. तीन वर्षे पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांना दोन पर्याय उपलब्ध असतील. ‘ऑनर्स’ पदवी घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना चार वर्षांत १६० ते १७६ क्रेडिट्स पूर्ण करावे लागतील, ज्यामध्ये शेवटच्या वर्षात इंटर्नशिपचा समावेश असेल. तर संशोधनासह ‘ऑनर्स’ निवडणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांच्या मुख्य विषयात १२ क्रेडिट्सचा संशोधन प्रकल्प किंवा प्रबंध पूर्ण करणे अनिवार्य असेल. चौथ्या वर्षाच्या प्रवेशासाठी पहिल्या तीन वर्षांत किमान १२० ते १३२ क्रेडिट्स मिळवणे आवश्यक असल्याचे उच्च व तंत्रशिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे.

संशोधन पदवीसाठी विद्यार्थ्यांना किमान ७.५ ‘सीजीपीए’ मिळवणे आवश्यक आहे. या अभ्यासक्रमाची प्रवेश क्षमता मान्यताप्राप्त पीएचडी मार्गदर्शकांच्या उपलब्धतेवर अवलंबून असेल आणि प्रत्येक मार्गदर्शकाकडे पाच विद्यार्थ्यांना प्रवेश घेता येईल. विद्यार्थ्यांना क्रेडिट ट्रान्स्फर आणि ‘मल्टिपल एन्ट्री-एक्झिट’चा लाभ मिळावा यासाठी ‘ॲकॅडमिक बँक ऑफ क्रेडिट्स’ (एबीसी) प्लॅटफॉर्मवर नोंदणी करणे बंधनकारक करण्यात आले आहे.

पात्रता आणि जागांच्या उपलब्धतेनुसार विद्यार्थ्यांना चौथ्या वर्षासाठी इतर महाविद्यालयात किंवा विद्यापीठ विभागात प्रवेश घेता येईल.

ज्या महाविद्यालयांकडे सध्या केवळ तीन वर्षांचे अभ्यासक्रम आहेत, त्यांना चौथ्या वर्षासाठी विशेष परवानगी घ्यावी लागेल. मात्र, ज्या ठिकाणी आधीच पदव्युत्तर अभ्यासक्रम किंवा पीएचडी केंद्रे उपलब्ध आहेत, त्यांना कोणतीही अतिरिक्त परवानगी न घेता ‘ऑनर्स’ आणि संशोधन पदवी अभ्यासक्रम सुरू करता येतील.

SL/ML/SL

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *