नागपूर-गोवा शक्तीपीठ महामार्गाचा सुधारित आराखडा मंजूर

 नागपूर-गोवा शक्तीपीठ महामार्गाचा सुधारित आराखडा मंजूर

मुंबई, दि. 3 : आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी राज्य सरकारने शक्तीपीठ एक्सप्रेसवेच्या सुधारित आराखड्याला मंजुरी दिली आहे. या नव्या आराखड्यात शेतकरी आणि पर्यावरणीय आक्षेप लक्षात घेऊन महत्त्वपूर्ण बदल करण्यात आले असून, प्रकल्पाची लांबी, खर्च आणि भौगोलिक विस्तार वाढला आहे. नुकत्याच मंजूर झालेल्या आराखड्यानुसार, एक्सप्रेसवेची लांबी ८०२.५९२ किमीवरून ८५६.७६५ किमीपर्यंत वाढली असून सुमारे ५४ किमीची वाढ झाली आहे. तसेच प्रकल्पाचा अंदाजित खर्च सुमारे ८०,००० कोटी रुपयांवरून जवळपास १ लाख कोटी रुपयांपर्यंत वाढला आहे. पर्यावरणतज्ज्ञांनी पश्चिम घाट आणि कोकणातील संवेदनशील भागांमधून मार्ग जाण्याबाबत चिंता व्यक्त केली होती. त्यामुळे हा प्रकल्प काही काळ स्थगित ठेवण्यात आला होता.

नवा कॉरिडॉर वर्धा ते सिंधुदुर्ग असा असणार आहे. हा मार्ग नांदेड, हिंगोली, परभणी, सोलापूर, सांगली, कोल्हापूर यांसह अनेक जिल्ह्यांतून जाणार आहे, ज्यामुळे राज्यातील विविध भागांमध्ये थेट कनेक्टिव्हिटी निर्माण होणार आहे. सुधारित आराखड्यात सातारा जिल्ह्याचा नव्याने समावेश करण्यात आला आहे. सुमारे ४० किमीचा मार्ग गोंदवले आणि शिखर शिंगणापूर गावांमधून जाणार आहे.

हा ६-लेन ग्रीनफिल्ड एक्सप्रेसवे १३ जिल्हे आणि ४० तालुक्यांना जोडणार आहे. माहूर (नांदेड), तुळजापूर (धाराशिव) आणि कोल्हापूर यांसारख्या धार्मिक स्थळांना यामुळे थेट जोड मिळणार आहे.

सर्वात महत्त्वाचे म्हणजे नागपूर ते गोवा प्रवासाचा कालावधी १८ तासांवरून अंदाजे ८ तासांपर्यंत कमी होण्याची अपेक्षा आहे. याशिवाय व्यापार, पर्यटन आणि प्रादेशिक विकासाला मोठी चालना मिळणार आहे.

SL/ML/SL

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *