२८-२९ मार्चला महिलांची महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा

 २८-२९ मार्चला महिलांची महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा

सोलापूर, दि. १७ : येथे २८ आणि २९ मार्च रोजी चौथ्या महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचे आयोजन केले जाणार असून निर्झरा केअर फाऊंडेशन, सोलापूर या संस्थेकडे स्पर्धेचे संयोजनपद देण्यात आले आहे. या स्पर्धेत ४२ जिल्ह्यांच्या संघांचे ४००हून अधिक खेळाडू सहभागी होणार असून महिला महाराष्ट्र केसरी किताबासाठी भाग्यश्री फंड ही प्रमुख दावेदार आहे. यापूर्वी तिने तीन वेळा हा किताब जिंकला होता.

निर्झरा केअर फाऊंडेशनच्या संचालिका आणि संस्थापक स्वाती साखरे, केंद्रीय नागरी विमान वाहतूक आणि सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ व महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष रामदास तडस, संघाचे सरचिटणीस योगेश दोडके यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. ही स्पर्धा सोलापूर जिल्ह्यातील सिद्धेश्वर पेठ परिसरात असलेल्या हरीभाई देवकरण प्रशाला व महाविद्यालयाच्या मैदानावर होणार आहे.

या स्पर्धेसाठी ५० किलो, ५३ किलो, ५५ किलो, ५७ किलो, ५९ किलो, ६२ किलो, ६५ किलो, ६८ किलो, ७२ किलो तसेच महाराष्ट्र केसरी गट (६५ ते ७६ किलो) असे वजनी गट ठेवण्यात आले आहेत. प्रत्येक गटातील पहिल्या तीन विजेत्यांना अनुक्रमे सुवर्ण, रौप्य व कांस्यपदके दिली जाणार असून महाराष्ट्र केसरी किताब जिंकणाऱ्या महिला कुस्ती केलेला मानाची गदा देऊन गौरविण्यात येणार आहे.

तीन वेळा विजेतेपद मिळवणाऱ्या भाग्यश्री हिच्यापुढे अमृता पुजारी, प्रगती गायकवाड, अंकिता फटाले, वेदांतिका पवार यांचे आव्हान असणार आहे. भाग्यश्रीने स्पेनमध्ये आयोजित करण्यात आलेल्या २० वर्षांखालील गटाच्या जागतिक स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व केले होते. तसेच थायलंडमध्ये झालेल्या आशियाई स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले होते. गतवेळच्या महाराष्ट्र केसरी जेतेपदाच्या लढतीत भाग्यश्रीने अमृताला पराभूत करीत विजेतेपद मिळवले होते.

“पुरुषांच्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेची दरवर्षी महाराष्ट्राच्या क्रीडा क्षेत्रात मोठी उत्सुकता असते. तशीच महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धासुद्धा आपली छाप पाडते आहे. वडिलांच्या स्मृतिप्रीत्यर्थ स्वाती साखरे यांनी निर्झरा केअर फाऊंडेशनच्या माध्यमातून चौथी महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धा आयोजित केली आहे. मी आणि आमची संघटना या आयोजनासाठी त्यांच्या सर्वतोपरी पाठीशी असू,” असे केंद्रीय नागरी विमान वाहतूक आणि सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले.

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *