जागतिक वारसा स्थळ असलेल्या घारापुरी बेटावर कचऱ्याचे ढिग
मुंबई, दि. १७ : मुंबईच्या अगदी नजिक समुद्रात वसलेले घारापुरी अर्थात एलिफंटा हे जागतिक वारसा स्थळ सध्या कचऱ्यांच्या ढिगाऱ्यामुळे त्रस्त झाले आहे. काल राबवण्यात आलेल्या एका विशेष स्वच्छता मोहिमेत ५०० मीटरच्या परिघातून २.५ टन कचरा हटवण्यात आला. या मोहिमेने मुंबई आणि आसपासच्या सागरी प्रदूषणाची भयावह स्थिती पुन्हा एकदा समोर आणली आहे.
वनशक्ती’ या पर्यावरण संस्थेच्या ‘सागरशक्ती’ (किनारपट्टी विभाग) पुढाकाराने ही मोहिम राबवण्यात आली. यामध्ये महाराष्ट्र वन विभागाचा मॅन्ग्रोव्ह कक्ष, न्हावा, गव्हाण, दिवाळे कोळीवाडा आणि परिसरातील पारंपारिक मच्छिमार संघटना, ६० हून अधिक निसर्गप्रेमी आणि अधिकारी यांनी सक्रिय सहभाग नोंदवला. केवळ ५०० मीटर अंतरात सापडलेल्या कचऱ्यामध्ये बाटल्या, पिशव्या आणि वेष्टने, टाकाऊ जाळी आणि इतर जुने साहित्य, चपला, गाद्या आणि इतर टाकाऊ सामान, वैद्यकीय कचरा आदी वस्तूंचा समावेश होता.
या मोहिमेतून समोर आलेले वास्तव पाहता, पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी किनारी भागात कचरा टाकणाऱ्यांवर प्रशासकीय वचक निर्माण करणे, स्थानिक समुदाय आणि पर्यटकांमध्ये सागरी परिसंस्थेबद्दल जागरूकता निर्माण करणे, वारसा स्थळांच्या ठिकाणी कचरा व्यवस्थापन यंत्रणा अधिक सक्षम करणे आदी पावले उचलणे आवश्यक असल्याचे तज्ज्ञांनी नमूद केले. एलिफंटा बेटासारख्या ऐतिहासिक वारशाचे रक्षण करण्यासाठी आता केवळ सरकारी यंत्रणाच नव्हे, तर नागरिकांनीही जबाबदारीने वागणे काळाची गरज बनले आहे.
मुंबई आपल्या किनाऱ्यांशी किती बेफिकीरपणे वागते, याचे हे पुन्हा एकदा दुर्दैवी उदाहरण आहे. मॅन्ग्रोव्ह स्वच्छता मोहिमांमध्ये टनावारी प्लास्टिकसोबतच गाद्या आणि वैद्यकीय कचरा आढळणे ही चिंतेची बाब आहे.
- बी. एन. कुमार, संचालक, नॅटकनेक्ट फाऊंडेशन