डिजिटल अरेस्ट – निवृत्त बेस्ट कर्मचाऱ्याला 40 लाखांचा गंडा
मुंबई, दि. 14 : डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली भांडुपमध्ये एका निवृत्त बेस्ट कर्मचाऱ्याला तब्बल ३९.६० लाखांचा गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मनी लाँड्रिंगच्या गुन्ह्यात अडकवण्याची भीती दाखवत भामट्यांनी पोलीस अधिकारी असल्याचे भासवले आणि या ज्येष्ठ नागरिकाची आयुष्यभराची कमाई हडप केली. याप्रकरणी ईस्ट सायबर पोलिसांनी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
तक्रारदार भांडुप पश्चिम येथे राहणारे दीपक मोंडकर सायबर चोरांनी इतके घाबरवले होते की, त्यांना घर सोडून कुठेही न जाण्याची ताकीद दिली होती. एका अर्थाने त्यांना घरातच ‘डिजिटल अटक’ करून ठेवण्यात आले होते. कायदेशीर कारवाईची भीती दाखवून सायबर भामट्यांनी त्यांना विविध खात्यांवर पैसे वर्ग करण्यास भाग पाडले.