आता 25 दिवसांनंतरच बुक करता येईल गॅस सिलिंडर
मुंबई, दि. 9 : इराण युद्धाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या इंधन टंचाईमुळे घरगुती गॅस सिलिंडरचे दर तब्बल 60 रुपयांनी वाढल्याने सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले आहे. त्यातच आता गॅस मिळण्यासाठी अधिक प्रतिक्षा करावी लागणार आहे. केंद्र सरकारने घरगुती एलपीजी सिलेंडरच्या रिफिल बुकिंगच्या नियमांमध्ये बदल केला आहे. आता ग्राहक एक सिलेंडर बुक केल्यानंतर दुसरा सिलेंडर 21 दिवसांऐवजी 25 दिवसांनंतरच बुक करू शकतील. म्हणजेच, सरकारने रिफिल बुकिंगचा किमान प्रतीक्षा कालावधी 4 दिवसांनी वाढवला आहे.
मध्य पूर्वेतील तणावाच्या पार्श्वभूमीवर सरकारने गॅसची साठेबाजी रोखण्यासाठी आणि सर्व ग्राहकांना समान पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी हे पाऊल उचलले आहे. सरकारी सूत्रांनी पीटीआयला ही माहिती दिली आहे.
सरकारी सूत्रांनुसार, गेल्या काही काळापासून असे दिसून येत होते की, गरज नसतानाही लोक सिलेंडर बुक करून साठा करत होते. प्रतीक्षा कालावधी 25 दिवस केल्याने अनावश्यक बुकिंगला आळा बसेल. यामुळे ज्यांना खरोखर गरज आहे, त्यांना सहजपणे सिलेंडर मिळू शकेल.