हे गाव झाले जातमुक्त, ग्रामपंचायतीने केला ठराव
अहिल्यानगर, दि. ११ : अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील सौंदाळा या गावाने आधुनिक युगाला साजेसा असा एक स्तुत्य निर्णय घेतला आहे. सौंदाळा गावाच्या ग्रामसभेत सरपंच शरद आरगडे यांनी जात हद्दपार करण्याचा, म्हणजेच जातमुक्त गावाचा ठराव मांडला. यावेळी उपस्थित ग्रामस्थांनी कोणताही विरोध न करता या ठरावाला संपूर्ण पाठिंबा दिला. गावातील सर्व नागरिक समान असून, ‘माझी जात – मानव’ ही भावना स्वीकारण्यात आली आहे. विशेष म्हणजे, आंतरजातीय विवाहांना पूर्णपणे मान्यता देण्यात आली असून अशा विवाहांना प्रोत्साहन देण्याचा निर्णयही ग्रामसभेत घेण्यात आला आहे.
याआधी या गावात शिवीगाळ बंदी, विधवा पुनर्विवाहास प्रोत्साहन, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी विविध योजना तसेच गावाच्या सर्वांगीण विकासासाठी अनेक महत्त्वाचे ठराव सौंदाळा ग्रामपंचायतीमार्फत मंजूर करण्यात आले आहेत.
SL/ML/SL