ST प्रवासासाठी लागू होणार ‘नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड’ प्रणाली
मुंबई, दि. ११ : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून प्रवाशांच्या सुविधेसाठी ‘नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड’ (NCMC) प्रणाली लागू करण्यात येणार असून, विविध सामाजिक सवलतींचा लाभ घेण्यासाठी हे कार्ड आता अनिवार्य असेल, अशी माहिती परिवहन मंत्री तथा एस.टी. महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली आहे. नवीन कार्डसाठी १९९ रुपये मोजावे लागतील. मात्र, ज्यांच्याकडे जुने स्मार्ट कार्ड आहे, त्यांना ते जमा केल्यास केवळ १४९ रुपयांत नवीन कार्ड मिळेल.
या निर्णयामुळे एस.टी.चा प्रवास आता खऱ्या अर्थाने ‘डिजिटल’ होणार असून, पारदर्शक प्रतिपूर्ती आणि रोखविरहित व्यवहारांना गती मिळणार आहे. महामंडळाने मे. ईबिक्स टेक्नोलॉजिस लि. आणि एन.एस.डी. एल. पेमेंट्स बँक यांच्याशी करार केला असून, लवकरच सर्व आगारांमध्ये नोंदणी मोहीम सुरू होणार आहे. प्रमुख लाभार्थी आणि नोंदणी प्रक्रिया या योजनेत समाजातील सर्व घटकांचा विचार करण्यात आला आहे.
- शालेय व तांत्रिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांच्या ‘सरल’ क्रमांकाशी जोडलेले कार्ड मिळेल.
- अमृत ज्येष्ठ, सर्वसाधारण ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना ‘आधार’ संलग्न कार्ड दिले जाईल.
- दिव्यांगांना UDID क्रमांकाचा वापर करून विशेष सुविधा असलेले कार्ड प्राप्त होईल.
- स्वातंत्र्यसैनिक आणि अधिस्वीकृतीधारक पत्रकारांना विभागीय कार्यालयामार्फत कार्डाचे वितरण केले जाईल.
SL/ML/SL