भाजपा – महायुतीच्या विकासाच्या राजकारणाला मतदारांचा स्पष्ट कौल
मुंबई दि ९ : 12 जिल्हा परिषदा व 125 पंचायत समिती निवडणुकांमध्ये भारतीय जनता पार्टी राज्यभरात क्रमांक एकचा पक्ष ठरला असून, या निकालांमधून भाजपा – महायुतीच्या विकासाच्या राजकारणाला मतदारांनी स्पष्ट पसंती दिली आहे. 12 जिल्हा परिषदांपैकी सर्व ठिकाणी भाजपा आणि महायुतीचीच सत्ता येणार असून 125 पंचायत समित्यांपैकी 50 पेक्षा अधिक ठिकाणी भाजपा सत्ता स्थापन करेल, असे प्रतिपादन भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केले. यावेळी भाजपा माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन उपस्थित होते.
या निवडणुकीत महायुतीचे 80 टक्क्यांपेक्षा जास्त प्रतिनिधी निवडून आले असून उबाठा, काँग्रेसला मतदारांनी स्पष्टपणे नाकारले असल्याचेही चव्हाण म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील एनडीए सरकारने मागच्या 11 वर्षांत समाजातील प्रत्येक घटकाच्या उन्नतीसाठी आणि प्रत्येक क्षेत्राच्या प्रगतीसाठी राबवलेल्या विकासाभिमुख धोरणांवर जनतेने विश्वास व्यक्त केला आहे असेही चव्हाण यांनी नमूद केले.
चव्हाण यांनी सांगितले की, कार्यकर्त्यांच्या प्रत्येक निवडणुकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाजपाची विचारधारा तळागाळात पोहोचवण्यासाठी रात्रीचा दिवस करत प्रचार करतात. मात्र यावेळी अजितदादांच्या निधनानंतर संवेदनशील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवडणुकीच्या प्रचारात भाग न घेण्याचे तसेच कोणत्याही प्रकारचा जल्लोष न करण्याचे आवाहन केले आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रचारात भाग घेतला नसला तरीही महायुती सरकारने जनतेच्या हितासाठी ताकदीने केलेल्या विकासकामांमुळे भाजपा महायुतीच्या पारड्यात मतदारांनी भरभरून मते टाकल्याबद्दल चव्हाण यांनी मतदारांचे आभार मानले.
विरोधकांकडून सातत्याने नकारात्मक राजकारण केले जात असताना, भाजपाने मात्र लोकहित केंद्रस्थानी ठेवून विकासाचे राजकारण केले असल्याने मतदारांनी महायुतीला साथ दिली. आगामी काळात ग्रामीण महाराष्ट्र अधिक सक्षम करण्यासाठी भाजपा कटिबद्ध राहील, अशी ग्वाही चव्हाण यांनी दिली.ML/ML/MS