मुंबई-पुणे ‘मिसिंग लिंक’ वर या गाड्यांना No Enrty
मुंबई, दि. ७ : गेल्या आठवड्या अखेरीस मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर ज्वालाग्रही गॅस टँकरच्या उलटण्यामुळे ३६ तासांच्या अभूतपूर्व वाहतूक कोंडीत हजारो प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला. त्यामुळे प्रवाशांनी आता या महामार्गाचा धसकाच घेतला आहे. या मार्गावर सातत्याने असणाऱ्या गर्दीचे नियोजन करण्यासाठी विविध उपाय शोधले जात आहेत. मिसिंग लिंकमुळे या वाहतूक कोंडीवर काहीसा दिलासा मिळणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. मिसिंग लिंकवरील प्रवास केवळ जलदच नाही, तर ‘झिरो रिस्क’ करण्यासाठी प्रशासनाने मोठा बदल केला आहे. या १९.८० किमीच्या नवीन मार्गिकेवरून कोणत्याही प्रकारची स्फोटके, गॅस टँकर किंवा ज्वलनशील पदार्थ वाहून नेणाऱ्या वाहनांना प्रवेश दिला जाणार नाही.
वाहतुकीच्या नियमांनुसार अशा वाहनांवर बंदीची तरतूद करण्यात आली आहे. यामुळे बोगद्यामध्ये किंवा घाटात गॅस गळती किंवा स्फोट होऊन होणाऱ्या मोठ्या दुर्घटनांची भीती कायमची मिटणार आहे.
मिसिंग लिंकमुळे वेळेची बचत होऊन प्रवासाचा वेळ ३० मिनिटांनी कमी होईल.बोरघाटातील अवघड वळणे आणि चढ-उतार टाळता येतील. याशिवाय प्रवासाचे अंतर ६ किमीने कमी होणार आहे. ज्यामुळे पैसे आणि वेळ दोन्ही वाचेल.
६,६९५ कोटी रुपये खर्चाचा हा प्रकल्प आता अंतिम टप्प्यात असून राज्य सरकारने MSRDC ला काम युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत. खोपोली ते कुसगाव या १९ किमीच्या टप्प्यात आशियातील सर्वात रुंद बोगदे आणि उंच पूल बांधण्यात आले आहेत. येत्या काही महिन्यांत ही मार्गिका खुली होणार आहे.
SL/ML/SL