१२ जिल्हापरिषदा आणि १२५ पंचायत समित्यांसाठी उद्या मतदान
मुंबई, दि. ६ : राज्यातील 12 जिल्हा परिषदा आणि त्यांतर्गतच्या 125 पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी उद्या (ता. 7) मतदान होत असून जिल्हा परिषदेच्या 731; तर आणि पंचायत समित्यांच्या 1 हजार 462 जागांसाठी ही निवडणूक होत आहे. एकूण 7 हजार 438 इतके उमेदवार निवडणूक रिंगणात असून सर्व मिळून एकूण 2 कोटी 8 लाख 20 हजार 702 इतकी मतदार संख्या आहे. संपूर्ण मतदान प्रक्रियेसाठी यंत्रणा सज्ज आहे.
राज्य निवडणूक आयोगाने रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशिव आणि लातूर या 12 जिल्हा परिषदा आणि त्यांतर्गतच्या 125 पंचायत समित्यांच्या निवडणूक कार्यक्रमाची घोषणा 13 जानेवारी 2026 रोजी केली होती. त्यानुसार 5 फेब्रुवारी 2026 रोजी मतदान होणार होते; परंतु उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनामुळे राज्यात तीन दिवसांचा दुखवटा जाहीर झाल्यानंतर मतदानाच्या तारखेत बदल करण्यात आला. त्यानुसार आता उद्या (ता. 7) सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत मतदान होणार आहे. मतमोजणी 9 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 10 वाजता सुरू होईल. त्यानंतर आचारसंहिता संपुष्टात येईल.
सर्व बारा जिल्हा परिषदांच्या एकूण 731 जागा असून, त्यातील 369 जागा महिलांसाठी राखीव आहेत. अनुसूचित जातींसाठी 83, अनुसूचित जमातींसाठी 25 आणि नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गासाठी 191 जागा आरक्षित आहेत. जिल्हा परिषदांच्या या सर्व जागांसाठी एकूण 2 हजार 624 उमेदवार निवडणूक लढवित आहेत.
सर्व 125 पंचायत समित्या मिळून एकूण 1 हजार 462 जागा असून, त्यातील 731 जागा महिलांसाठी राखीव आहेत. अनुसूचित जातींसाठी 166, अनुसूचित जमातींसाठी 38 आणि नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गासाठी 342 जागा आरक्षित आहेत. पंचायत समित्यांच्या या सर्व जागांसाठी एकूण 4 हजार 814 उमेदवार निवडणूक लढवत आहेत.
SL/ML/SL