कृषी अधिकाऱ्याकडून शेतकऱ्याला बुटाने मारहाण
वाशिम, दि. 14 : मंगरुळपीर तालुक्यातील गोगरी परिसरात एका मुजोर कृषी अधिकाऱ्याने शेतकऱ्याला बुटाने मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मनरेगा योजनेअंतर्गत संत्री फळबागेच्या अनुदानाबाबत विचारणा केल्याने तालुका कृषी अधिकाऱ्याने बुटाने व मातीच्या ढेकळाने मारहाण केल्याचा संतापजनक प्रकार घडला. यासंबंधीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
सचिन कांबळे असे मारहाण करणाऱ्या कृषी अधिकाऱ्याचे नाव आहे. त्याने ऋषिकेश पवार या तरुण शेतकऱ्याला मारहाण केल्याचे समजते. हे प्रकरण पोलिसांपर्यंत गेले. मात्र, ते सामोपचाराने मिटवण्यात आले.
शेतकरी ऋषिकेश पवार यांनी वाशिम जिल्ह्याचे अधीक्षक कृषी अधिकारी यांच्याकडे तक्रार दाखल केली होती. गोगरी, हिरंगी, खेर्डा बु., खुर्डा खु. येथील सुमारे 15 फळबाग उत्पादक शेतकरी रोजगार हमी योजनेंतर्गत फळबाग गटापासून वंचित असल्याचे त्यांनी तक्रारीत नमूद केले होते. संबंधित गट न काढल्यामुळे शेतकरी शासनाच्या विविध योजनांच्या लाभापासून वंचित राहत असल्याचा आरोप त्यांनी केला होता. तसेच प्रलंबित गट तत्काळ काढून देण्यात यावेत, अन्यथा आमरण उपोषण करण्याचा इशाराही त्यांनी निवेदनातून दिला होता.
मिळालेल्या माहितीनुसार, गोगरी येथील तरुण शेतकरी ऋषिकेश पवार यांनी दोन वर्षांपूर्वी आपल्या तीन एकर शेतात मनरेगा योजनेंतर्गत संत्री फळबाग लावली होती. या फळबागेसाठी शासनाकडून मिळणारे अनुदान गेल्या चार महिन्यांपासून रखडल्याचा त्यांचा दावा आहे. दरम्यान, मंगरुळपीरचे तालुका कृषी अधिकारी सचिन कांबळे हे गोगरी शिवारात पाहणीसाठी आले असता, ऋषिकेश पवार यांनी त्यांच्याकडे रखडलेल्या अनुदानाबाबत विचारणा केली.
मारहाण प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी तालुक्यातील शेतकरी संघटनांनी केली आहे. दरम्यान, तालुका कृषी अधिकारी सचिन कांबळे यांनी शेतकरी ऋषिकेश पवार यांना बुटाने मारहाण केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून, त्यामध्ये शेतकऱ्याला बुटाने मारहाण होत असल्याचे दृश्य दिसत असल्याचा दावा केला जात आहे.