तस्करीसाठी वाढला क्रिप्टोकरन्सीचा वापर – DRI चा अहवाल
नवी दिल्ली , दि. १४ : तंत्रज्ञान प्रगत होत जाते तसे गुन्हेगारही अधिक अद्ययावत राहून काम करू लागतात. असाच प्रकार आता तस्करीच्या बाबतीतही घडत आहे. Diroctaret of Revenue Intelligence ने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या अहवालात सोने, अमली पदार्थांच्या तस्करीसाठी cryptocurrency चा वापर अलीकडच्या वर्षांत लक्षणीयरीत्या वाढल्याचे नमूद केले आहे. यूएसडीटीसारखी स्टेबलकॉइन्स पारंपरिक हवाला नेटवर्कची जागा घेत असल्याचेही अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे. या डिजिटल मालमत्तांमुळे जलद व गुप्त आर्थिक व्यवहार शक्य होत असून त्यावर मर्यादित देखरेख आहे आणि मनी लॉन्डरिंगविरोधी नियमांचे पालन कमकुवत असल्याचे डीआरआयने नमूद केले आहे.
पारंपरिक तस्करी नेटवर्क आणि नव्या डिजिटल आर्थिक प्रणाली यांच्यातील एकत्रीकरण वाढत आहे. विकेंद्रित आणि अर्ध-अज्ञात स्वरूपामुळे क्रिप्टोकरन्सी तस्करांना निधी हस्तांतरण आणि बेकायदेशीर नफ्याचे लपवणे सोपे करून देते. त्यामुळे तपास आणि अंमलबजावणी अधिक गुंतागुंतीची होत आहे.
क्रिप्टोकरन्सी व्यवहारांचा माग काढण्यासाठी डीआरआयने ब्लॉकचेन अॅनालिटिक्सचा केलेला वापर हा क्रिप्टो गुन्ह्यांविरुद्ध लढ्यात महत्त्वाचा टप्पा आहे. डिजिटल मालमत्तांचे बदलते स्वरूप लक्षात घेता प्रगत फॉरेन्सिक साधनांची गरज आहे.
DRI नुसार, अनेकदा अज्ञात असलेली आणि व्हीपीएनद्वारे सहज वापरता येणारी क्रिप्टो वॉलेट्स ‘ऑफ-द-बुक’ बेकायदेशीर पेमेंटसाठी वापरली जात आहेत. यात कमी किंमत दाखवलेली (अंडर-इनव्हॉइस्ड) किंवा चुकीची माहिती दिलेली आयात समाविष्ट असून त्यामुळे तस्कर सीमाशुल्क शुल्क, कर आणि इतर नियामक अटी चुकवतात. बिटकॉइनसारख्या क्रिप्टोकरन्सींच्या अर्ध-अज्ञात स्वरूपामुळे फसवणूक करणाऱ्यांना आपली ओळख लपवता येते. ज्यामुळे तपास व अंमलबजावणी कठीण होते. सोन्याची आणि अंमली पदार्थांची तस्करी करताना विक्रीतून मिळालेली रक्कम हवाला मार्गे किंवा क्रिप्टोकरन्सीतून परदेशातील सूत्रधारांकडे पाठवली जाते.
SL/ML/SL