माजी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या शिक्षेला अंतरिम स्थगिती
मुंबई दि १९ : माजी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या शिक्षेला मुंबई उच्च न्यायालयाने अंतरिम स्थगिती दिली असून अंतिम सुनावणी पर्यंत ही शिक्षा स्थगित केली आहे. मात्र त्यांच्या दोषसिद्धीला स्थगिती देण्यास उच्च न्यायालयाने नकार दिला आहे.
माणिकराव कोकाटे यांनी नाशिक सत्र न्यायालयाच्या आदेशाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. आज झालेल्या सुनावणीत न्यायमूर्ती राजेश लढ्ढा यांनी कोकाटे यांच्या याचिकेवर सुनावणी केली. दोष सिद्धीला स्थगिती आणि सजा रद्द करण्याची मागणी या याचिकेत करण्यात आली होती. मात्र न्यायालयाने दोषसिद्धी कायम राहील असे स्पष्ट करत त्यांच्या शिक्षेला अंतिम सुनावणी पर्यंत स्थगिती दिली आहे.
सत्र न्यायालयाने खालील न्यायालयाची शिक्षा कायम केल्यानंतर अटक वॉरंट जारी करण्यात आले होते. त्यामुळे नाशिक मधील पोलीस कोकाटे यांच्या अटकेसाठी मुंबईत दाखल झाले होते, मात्र कोकाटे रुग्णालयात दाखल असल्याने त्यांची अटक तात्पुरती टळली होती. ती आता न्यायालयाच्या आदेशामुळे आणखी काही काळासाठी टळली आहे. न्यायालयाने दोष सिद्धीला स्थगिती देण्यास नकार दिल्यामुळे त्यांच्या आमदारकीवरची टांगती तलवार अद्यापही कायम आहे. आज न्यायालयाने कोकाटे यांना एक लाखाचा अंतरिम जामीन देखील मंजूर करण्यात आला आहे.ML/ML/MS